महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेसने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्याकडे केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा तसेच आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी निवडणूक प्रकिया मतपत्रिकेच्या माध्यमातूनच राबविण्याचा आणि मतदार यादीतील बोगस मतदार वगळण्याची मागणी लावून धरली. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेसने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची माहिती पुराव्यांसह दिली होती. मात्र, अद्याप हे सगळे मतदार वगळले गेले नाहीत, अशी माहिती शर्मा यांनी आयोगाला दिली.  त्यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी २ लाख १६ हजार बोगस मतदारांची नावे यादीतून वगळले असून, उर्वरीत मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश शर्मा यांनी बोगस मतदारांची नावे वगळण्याबाबत आयोगाकडून दिरंगाई होत असल्याचे सांगितले. मुक्त व निर्भय वातावरणात निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता बोगस मतदारांची नावे मतदारयादीतून तात्काळ वगळण्याची गरजही त्यांनी विषद केली. मतदान यंत्रांवर जनतेचा विश्वास नसल्याने आगामी विधानसभा निवडणूक मतदान पत्रिकेवर घेण्याची मागणी बहुतांश राजकीय पक्षांनी केली आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने तात्काळ मान्य करावी, असा आग्रह देखील त्यांनी धरला. निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाच्या अॅड. गौरी छाब्रिया यांचा समावेश होता.