दिगंबर शिंदे

अर्ली द्राक्षाचा हंगाम यंदा लांबलेल्या पावसाने धोक्यात आला, तर हंगाम पाहून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर द्राक्ष बाजारात आणण्याचे उत्पादकांचे मनसुबे करोनाच्या संकटाने मातिमोल ठरले. टाळेबंदीमुळे तयार माल बाजारात विकला जाण्याची आणि त्याला ग्राहक मिळेलच याची खात्री नसल्याने व्यापाऱ्यांनी तयार माल खरेदी करण्यास नकार दिल्याने जिल्हय़ातील ३५ टक्क्यांहून अधिक माल अजूनही वेलीवरच आहे. तयार मालाचे पैसे करायचे म्हटले तर बेदाणा निर्मिती हा एकमेव पर्याय उरला असला तरी त्यासाठी लागणाऱ्या रासायनिक पदार्थाची वानवा, आणि शेड उभारणीही ऐनवेळी अशक्य अशा स्थितीत रानातच थेट सूर्यप्रकाशात बेदाणा निर्मितीचा प्रयोग के ला जात आहे.

सांगली जिल्हय़ात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. यापैकी २० टक्के क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले जाते, तर ३० ते ४० टक्के द्राक्षांचे उत्पादन हे बाजारपेठ समोर ठेवून केले जाते आणि उर्वरित माल हा बेदाणा तयार करण्याच्या हेतूनेच तयार केला जातो.  बाजारपेठेसाठी तयार केलेल्या आणि निर्यातीसाठी खास तयार केलेल्या द्राक्षापासून चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार होऊ शकत नाही. तर निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत ग्राहक वर्ग घेत नाही. तर देशांतर्गत बाजारासाठी तयार केलेल्या मालाची साल हलकी असल्याने बेदाण्याचा दर्जा आणि टिकाऊपणा अपेक्षेप्रमाणे मिळत नाही.

महागडय़ा औषधांचा वापर करूनही माल हाती लागणार नाही हे लक्षात येताच अनेक बागा सोडून देण्यात आल्या.परतीचा मान्सूनही अगदी नोव्हेंबर, डिसेंबपर्यंत रेंगाळल्याने या बागांचेही नुकसान झाले. तरीही काही जिद्दी शेतकऱ्यांनी यातून बागा वाचविल्या, त्यांना दरही चार किलोला २२० ते २७५ रुपये मिळत होता.

मार्च महिन्यात मालाची काढणी सुरू असतानाच बाजारपेठेवर करोनाचे संकट घोंगावू लागले. मार्च अखेरपासून तर टाळेबंदी लागू झाल्याने बाजारच बंद झाले. साडेचार महिन्यानंतर मालातील साखर परत वेलीस जाण्यास सुरुवात झाल्याने गोडीही कमी होऊ लागली आहे. तर निर्यातक्षम माल परदेशी बाजारपेठेतही स्वीकारला जाईल की नाही या धास्तीने पाठविणे थांबविण्यात आले. कंटेनर जाण्यास रस्तेच बंद असल्याने अडचणी वाढल्या.

निम्मा माल बागेतच

जिल्हय़ात सध्या ३५ टक्यांहून अधिक माल बागेतच आहे. ऐनवेळी या मालाचे काय करायचे असा प्रश्न सतावत असताना बेदाणा निर्मिती हा एकमेव पर्याय सध्या द्राक्ष उत्पादकासमोर आहे. मात्र बेदाणा उत्पादन करण्यासाठी लागणारे इथिल ओलेट आणि पोटॅशियम काबरेनेट बाजारातून गायब झाले. दळणवळण थांबल्याने मिळाले तर त्याचे दर दुपटीहून अधिक असल्याने परवडत नाही. तर द्राक्ष वाळवण्यासाठी लागणारे शेडही कमी पडत आहेत.  काहींनी तयार माल शीतगृहात ठेवला असला तरी तयार बेदाणा आणि द्राक्ष ठेवण्यासाठी आवश्यक शीतगृहे उपलब्ध नाहीत. बाजार कधी सुरळीत सुरू होईल याची खात्री नाही.

नवा प्रयोग

या अडचणीवर मात करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेत उत्पादकांना दिलासा देण्यासाठी द्राक्षतज्ज्ञांशी चर्चा करून पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. द्राक्षतज्ज्ञ नारायण तात्या म्हेत्रे यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या साधनातून चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो, असा विश्वास दिला आहे. या कृतीची माहिती देण्यासाठी खासदारांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचा प्रयत्नही केला आहे.

यानुसार इथिल ओलेट म्हणजेच डिपिंग ऑइलसाठी सूर्यफू ल तेलाचा वापर करता येऊ शकतो. तेल आणि चुन्याची निवळी यांचे मिश्रण करून त्यामध्ये द्राक्षे बुडवली तर बेदाणा निर्मिती होऊ शकते याची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेड जर उपलब्ध नसेल तर मोकळ्या वावरात उसाचे पाचट खाली टाकून त्यावर शेडनेट अंथरून जरी बेदाण्यावर थेट सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करता आली तरी जास्तीत जास्त पाच ते सात दिवसात बेदाणा तयार होऊ शकतो, असे खासदार पाटील यांनी सांगितले.