औरंगाबाद: राज्यातील  साखर कारखान्यातून प्राणवायू निर्मिती करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी उस्मानाबाद येथील धाराशिव  कारखान्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मदतीने प्राणवायू निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. तज्ज्ञांच्या समितीने या यंत्राच्या उपयुक्ततेचा अहवाल दिल्यानंतर शनिवारी खरेदीचे आदेश दिले जातील, असे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.

दहा टन प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प करून पाहण्याची इच्छा उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केली. तसेच येत्या काळात स्कीड माऊंटेन मशीनच्या आधारे प्राणवायू उभा करता येईल का, त्याची यंत्रणाही विकत घेण्याची तयारीही साखर कारखान्यांनी दाखविली आहे. प्राणवायूची कमतरता लक्षात घेऊन तैवानहून ऑक्सिजन कान्संट्रेटर खरेदी करण्याचे ठरविले आहे.

बहुतांश साखर  कारखाने बंद झाले आहेत. तरीही साखर कारखान्यातून प्राणवायू तयार करता येईल काय याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये तातडीने ७०० ऑक्सिजन कान्संट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कारखान्यांनी या कामी पुढाकार घ्यावा, असे पत्र राज्य साखर संघातर्फे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे प्राणवायू कमतरतेवर मात करण्यासाठी साखर कारखाने पुढाकार घेतील.  – जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय अध्यक्ष, साखर महासंघ