लोटे ‘एमआयडीसी’तील दुर्घटना; सहा जखमी

चिपळूण  : खेड तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये समर्थ केमिकल कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात तीन जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी तिघांना सांगलीला, तर अन्य तिघांना लोटे परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामध्ये सचिन तलवार (२३, रा. बेळगाव), मंगेश जानकर (२३, रा. कासई), विलास कदम (३५, रा. भेलसाई खेड) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. परवेझ आलम (२५, रा. उत्तर प्रदेश), ओंकार साळवी (२२, खेर्डी), आनंद जानकर (२५, कासई), रामचंद्र बहुतुले (५५, भेलसई), विश्वास शिंदे (५५, घाणेखुंट) आणि जितेश आखाडे (२४, तलवारवाडी खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घरडा केमिकल कंपनीत काही दिवसांपूर्वी मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच स्वरूपाचा गंभीर अपघात झाला आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

समर्थ केमिकल कंपनीत सकाळी साडेनऊच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट मुंबई-गोवा महामार्गावर दिसत होते. मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. धूर पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या दिशेने धाव ठोकली. स्फोटानंतर आग भडकली. आगीची माहिती मिळाल्यानंतर लोटे एमआयडीसीतील अग्मिशमन दल आणि ‘मदत ग्रुप’चे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. केमिकल कंपनीला आग लागल्यामुळे परिसरातील हवा दूषित झाली होती. त्यामुळे आग विझवणारे आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही श्वसनाचा त्रास जाणवत होता.