महामार्गानजीकच्या वस्त्यांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य; कचऱ्याच्या वर्गीकरणाचा वसई-विरार पालिकेचा निर्णय
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : कारखान्यांमधील काही कचरा सध्या राष्ट्रीय महामार्गानजीक टाकला जात आहे. मात्र हा कचरा नेमक्या कोणत्या कारखान्यातून टाकला जात आहे, याचा शोध घेण्यासाठी पालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याच्या मालकाचा शोध घेण्याचे ठरवले आहे.
वसई-विरार शहरांतील काही कारखान्यांतील कचऱ्याची विल्हेवाट न लावता तो गोण्यांमध्ये भरून थेट महामार्गानजीक आणून फेकला जात आहे. काही नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार महामार्गानजीक असलेल्या काही कारखान्यांमधून हा कचरा फेकला जात आहे. त्याचा त्रास नजीकच्या रहिवाशांना होत आहे. मालजीपाडा, चिंचोटीफाटा, सातिवली, वसई फाटा, नालासोपारा फाटय़ासह इतर ठिकाणी महामार्गानजीक कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. कचऱ्याची तीव्र दुर्गंधी येत आहे. यात काही प्रमाणात रासायनिक कचरा असण्याची शक्यता असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.या कचऱ्याला आगी लावल्या जात आहेत. त्यातून निघणारे धुराचे लोट नागरी वस्तीत पसरत आहेत. त्यामुळे कोंडमारा होत आहे. या साऱ्या प्रकाराकडे पालिका अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशी करीत आहेत.
पालिकेची व्यूहरचना
* गेले अनेक दिवस पालिकेकडे कचऱ्याच्या समस्येविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाने पालिका हद्दीत कोणत्या प्रकारचे कारखाने आहेत. त्यातून कोणत्या स्वरूपाचा कचरा बाहेर आणला जातो. याविषयीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
* महामार्गानजीक छोटे-मोठे अनेक कारखाने आहेत. त्यामुळे त्याची शहानिशा करण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यातून काही माहिती पालिकेच्या हाती लागू शकते. त्यामुळे पुढील कारवाई करणे शक्य होईल.
* याला लगाम घालण्यासाठी कारखान्यांचे सर्वेक्षण करून कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरही कचरा आढळून आला तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल.
* पालिकेच्या नऊ प्रभागांत ज्या कंपन्या आहेत त्यांचे स्वच्छता निरीक्षक नेमून सर्वेक्षण केले जाणार आहे.
रस्त्याच्या कडेला टाकला जाणारा कचरा हा बहुतांश कारखान्यातील आहे. यासाठी स्वच्छता निरीक्षकांना सूचना देऊन आधी प्रभागनिहाय सर्वेक्षण करून माहिती घेतली जाईल. त्यानंतर जे कोणी कचरा टाकताना आढळून येईल. त्यावर कारवाई केली जाईल.
– नीलेश जाधव, स्वच्छता सहायक आयुक्त पालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2020 2:38 am