News Flash

कठोर निर्बंधांच्या निर्णयानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सल्ला; म्हणाले…

सरकारने केवळ लॉकडाउन किंवा निर्बंधांची चर्चा करून चालणार नाही, असं देखील बोलून दाखवलं आहे.

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळात आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने करोनाबाधितांची संख्या वाढत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही कडक निर्णय घेण्यात असून, त्यानुसार राज्यात आता शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. तर ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच, यावेळी त्यांनी सरकारने करोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत चर्चा करायला हवी व राज्यात प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत विवेचन करायला हवं, असा देखील सल्ला दिला.

राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, “राज्य सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं लक्षात येत आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो, की या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं. भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केलं आहे, की आताची करोनाची भयावह परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल, त्या दृष्टीने लसीकरण मोहीमेत भाजपाचे कार्यकर्ते सक्रीयतेने सहभागी होतील. हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे.”

तसेच,“एकूणच करोनाची परिस्थिती ही महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. माझ्या माहिती प्रमाणे आज जवळजवळ ५७ हजार केसेस करोनाच्या महाराष्ट्रात आहेत आणि मोठ्याप्रमाणात मृत्यूसंख्या देखील वाढते आहे. करोनाचं पुन्हा थैमान हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशापरिस्थितीत ज्या काही उपाययोजना सरकारच्यावतीने केल्या जातील, त्या उपाययोजनांना सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं आम्ही समजतो.” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

ठरलं! महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन

याचबरोबर “आमची ही देखील अपेक्षा आहे, सरकारने केवळ लॉकडाउन किंवा निर्बंधांची चर्चा करून चालणार नाही. त्यासोबत नवीन स्ट्रेन काय आहे? तो इतक्या वेगाने का वाढतो आहे? तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच का वाढतो आहे? त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? या संदर्भात देखील सरकारने विवेचन व चर्चा केली पाहिजे.” अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली.

“मुंबई व पुणे ही महाराष्ट्रामधील महत्वाची शहरं आहेतच तिथं काळजी घेतलीच गेली पाहिजे, पण मुंबई पुण्याच्या बाहेर देखील महाराष्ट्र आहे. हे सरकारला लक्षात घ्यावं लागेल आणि उर्वरीत महाराष्ट्रात संपूर्ण आरोग्य सेवा ही मनपाकडे नाही तर राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही आरोग्यसेवा आताच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम करावी लागेल. रूग्णालयांमध्ये बेड्सची उपलब्धता नाही, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत म्हणून याबाबत देखील सरकारने चर्चा करून याचा पुरवठा कसा वाढवता येईल, याचा विचार करायला हवा. तसेच, ज्याप्रकारे पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ट्रॅकिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट व यासोबत लसीकरण या गोष्टी किती वेगाने आपल्याला करता येतील, याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे.” असं देखील फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, आणखी एक विनंती राज्य सरकारला करत फडणवीस म्हणले की, राज्य सरकारने जवळजवळ सक्तीची कारवाई करून चार ते पाच हजार कोटी रुपये हे वीज ग्राहकांकडून जमवले आहेत. आतातरी राज्य सरकारने ही परिस्थिती पाहता वीज कनेक्शन तोडणं बंद केलं पाहिजे. कारण आता लॉकडाउन व निर्बंध हे जे सुरू होत आहेत, त्यामुळे रोजगारावर मोठ्याप्रमाणावर गदा येणार आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हा तुघलकी निर्णय ठरेल, म्हणून तत्काळ राज्य सरकारने हा निर्णय थांबवावा, अशी आमची विनंती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 6:50 pm

Web Title: fadnavis clarified the role on the decision taken by the state government msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउनला पुणेकरांचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचाच विरोध; पण… -अजित पवार
2 Lockdown In maharashtra : महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन
3 उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन
Just Now!
X