गतवर्षी आजमितीला निम्म्याने भरलेले महाकाय कोयना धरण सध्या जवळपास रितेच असल्याने कोयनेचा पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, अल्प पाणीसाठय़ामुळे कोयनेच्या जलविद्युतनिर्मितीला मर्यादा येऊन राज्याला आणखी वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे. मृग नक्षत्र अन् संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने बक्कळ पाण्यामुळे हिरवागार असलेल्या कृष्णा, कोयनाकाठीही टंचाईची दाहकता जाणवत असून, नद्यांना ओढय़ांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बहुतांश पाणीसाठवण प्रकल्पात खडखडाट असल्याने ठिकठिकाणी तीव्र पाणीटंचाई आ वासून आहे.
पावसाअभावी खरीप पुरता अडचणीत येऊ लागल्याने बळीराजासह सामान्य जनता हवालदिल झाली आहे. खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट असून, पाऊस आणखी लांबल्यास खरीप हातचा जाऊन शेतकऱ्याला रब्बी हंगामावर अवलंबून राहावे लागेल. सध्या विठोबाची आषाढी वारी सुरू असून, वैष्णव संप्रदाय वरुणराजाच्या कृपेसाठी विठुरायाला साकडे घालून आहेत. सातारा जिल्ह्यात ६० टँकरच्या जवळपास सव्वाशे वाडय़ावस्त्या व गावांमध्ये पाण्याच्या खेपावर खेपा सुरू असून, पाणीटंचाई वाढतच चालल्याने टँकरची संख्या वाढवून पाण्याच्या खेपाही वाढवणे अपरिहार्य असल्याचे चित्र आहे.
गतवर्षीच्या आजअखेर अध्रे भरलेले कोयना धरण या खेपेस तळ गाठून आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना शिवसागरात गतवेळी आजमितीला ५२.४४  (५० टक्के) पाणीसाठा होता. सध्या १३.९७ टीएमसी (१३.२७ टक्के) पाणीसाठा आहे. त्यातून मृत पाणीसाठा वगळता ८.८५ टीएमसी (८.४० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी धरणक्षेत्रात १५१४.२५ मि. मी. पाऊस झाला होता. सध्या हाच पाऊस  ३५२.३३ मि.मी. नोंदला गेला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत केवळ २० टक्के कोसळला आहे. गतखेपेस धरणाखालील कराड तालुक्यात सरासरी १६६ मि.मी. पाऊस नोंदला गेला होता. सध्या हाच पाऊस  ६९.९७ मि.मी. नोंदला गेला आहे. पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रातील नवजा व हेळवाक वगळता गतवर्षीचा पाऊस २७९.९ मि.मी. होता. यंदा हाच पाऊस ९०.७ मि.मी. नोंदला गेला आहे. गतवर्षी कोयना  धरणक्षेत्रातील महाबळेश्वर विभागात १५३० मि.मी. सर्वाधिक पाऊस झाला होता. सध्या  या विभागात धरण क्षेत्रातील सर्वात कमी १९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर कराड तालुक्यातील इंदोली विभागात १३, पाटण तालुक्यातील तारळे विभागात ३४ मि.मी. एवढा नाममात्र पाऊस झाला आहे. एकंदर पावसाची स्थिती पाहता मान्सूनचे पहिले सत्र कोरडेच गेल्याचे म्हणावे लागेल. तर लगेचच पावसास सुरुवात न झाल्यास खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. दरम्यान, पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यासह सर्वसामान्यांना चिंतेच्या खाईत लोटत आहे.