कर्जबाजारी आणि नापिकीमुळे उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा या गावात एका महिन्यात तीन जणांचा कर्जबळी गेला आहे. २ आणि ३ जानेवारीला सलग दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तर गुरूवारी बालाजी बाबाजी फेरे या ४५ वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेवून या संकटातून आपली सुटका करून घेतली आहे. या तिन्ही आत्महत्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्‍यांना अस्थिकलश देवून प्रशासनाचा निषेध करणार असल्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा गावातील बालाजी बाबाजी फेरे या शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कर्जबाजारी व नापिकीमुळे वाट्याला आलेली बिकट अवस्था सहन न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा दावा केला जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा देखील त्यांना दिलासा देवू शकली नाही. त्यासाठी शासनाचा निषेध करण्याकरिता ४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केलेल्या अस्थिंचा कलश जिल्हाधिकार्‍यांना देवून निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाबरोबर जिल्हा प्रशासन देखील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे तावरजखेडा गावात महिनाभरात तीन शेतकर्‍यांचा कर्जबळी गेला असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकरी फेरे यांच्या कुटूंबीयांना जोवर ठोस मदत आणि भविष्याबाबत उपाययोजना केल्या जात नाहीत, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.