25 February 2021

News Flash

‘ती’आत्महत्या शेतीच्या कर्जामुळे नव्हे’

घटनेबाबत तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

(प्रतिकात्मक छायाचित्र )

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच्या घटनेबाबत तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूल येथे भाषण सुरू होण्यापूर्वी जवळच्या भादुर्णा गावात उमेद महादेव चहाकाटे (५०) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असतानाच आता चहाकाटे शेतकरी नव्हते तर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, त्यांनी केलेली आत्महत्या ही शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे केलेली नाही, असे चौकशीअंती निदर्शनास आल्याचा अहवाल मूलच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे सादर केला आहे. दरम्यान, विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वातानुकूलित व्यासपीठावर भाषण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आठ किलोमीटरवर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे कळत नाही, यावरूनच राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे, हे दिसून येते अशी टीका केली आहे.

उमेद चहाकाटे आत्महत्या प्रकरणी तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत ते शेतकरीच नव्हते, तसेच त्यांनी शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. आदिवासी गोंड समाजातील चहाकाटे यांनी सकाळी १०.३० वाजता चिंचेच्या झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर मूल तहसीलदारांनी भादुर्णा येथे जाऊन उमेदची पत्नी रंजना चहाकाटे यांचे जबाब घेतले. शेती संयुक्त असून ती वडिलोपार्जित आहे. शेती  लहान भाऊ तेजराज महादेव चहाकाटे यांच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. या जमिनीवर उमेद चहाकाटे यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते व कोणतेही शासकीय कर्ज व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज, बचत गटामार्फत आम्ही घेतले नसल्याचे उमेदच्या पत्नीने सांगितले आहे. मृताचा भाऊ तेजराज चहाकाटे यांनीसुध्दा जमीन आपल्या ताब्यात असून यावर कोणतेही कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. तसेच ही जमीन सहधारकाच्या  नावावर असल्यामुळे सर्वानी मिळून जमीन कसणे उचित नव्हते तसेच आई व लहान भावासोबत राहत असल्याने शिवाय बहिणीची चोळी-बांगडी आपणच करतो. त्यामुळे ही जमीन मी व माझे कुटुंब कसून उत्पन्न स्वत: घेतो. भाऊ व त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करीत होते असेही त्याने सांगितले. त्यांच्याकडे अंत्योदय योजनेची शिधापत्रिका असून त्याव्दारे प्रतिमहिना ३५ किलो धान्य प्राप्त होते. तसेच सातबाराचे अवलोकन केले असता सातबारा संयुक्त असून कोणत्याही बॅंकेचे कर्ज नसल्याचे दिसून आले आहे. मंडळ अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात यापूर्वी देखील सातबारावर पीककर्ज घेतले नसल्याचे नमूद आहे. यावरून बँकेचे कर्ज असल्याने ही आत्महत्या झालेली नाही असे तहसीलदारांनी यात म्हटले आहे. याउलट उमेदला दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांच्या चौकशीत आढळले आहे.

विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी किमान मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले असते तर राज्यातील भाजप सरकारची लाज राहिली असती. परंतु मुख्यमंत्र्यांनी यापैकी काहीही केले नाही. यावरूनच भाजप सरकार शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते, असा आरोप विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:06 am

Web Title: farmer suicides in maharashtra devendra fadnavis
Next Stories
1 ‘अ’श्रेणीतील सर्वाधिक शाळा पुणे विभागात
2 कर्जमाफी नको असे म्हणून बंब यांनी शेतकऱ्यांशी गद्दारी केली- अंबादास दानवे
3 लाभाच्या पदांच्या नियमातून प्रतोदांना वगळण्याचा निर्णय
Just Now!
X