सांगलीतील ७२२ शेतकरी दोन महिन्यांपासून पैशांच्या प्रतीक्षेत

गेल्या हंगामात तूर उत्पादकांची स्थिती बिकट झाल्याचा अनुभव पाठीशी असताना यंदा तूर खरेदी होऊन दोन महिन्यांचा अवधी झाला तरी सांगलीतील ७२२ शेतकरी तुरीचे पसे बँक खात्यावर आज वर्ग होतात की उद्या याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या हंगामातील अद्याप खरेदी केलेली १९ लाख क्विंटल तूर गोदामात असतानाच यंदाही आठ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

गेल्या हंगामातील तुरीचा साठा अद्याप पडून असताना यंदाही शासनाने क्विंटलला ५ हजार ४५० रुपये दराने तूर खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, ही तूर खरेदी करीत असताना प्रारंभी हेक्टरी तीन क्विंटल खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तक्रारी वाढल्यानंतर ही मर्यादा १० क्विंटलपर्यंत वाढविण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून विविध निकष लावून सांगलीच्या बाजारात नाफेडकडून ७२२  शेतकऱ्यांची ७ हजार ९२६ क्विंटल तूर खरेदी केली आहे. मात्र या तुरीचे पसे अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झालेले नाहीत. ही रक्कम सुमारे १७ कोटी २२  लाख रुपये असून हा तूर उत्पादक प्रामुख्याने दुष्काळी भागातील आहे. या पशांसाठी शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे. मात्र, नाफेडकडून आज नाही तर उद्या पसे वर्ग होतील एवढेच उत्तर दिले जात आहे. सांगलीच्या बाजारात बुधवारी तुरीचा हमी दर ५ हजार ४५० रुपये असताना डाळीचा ठोक बाजारातील दर साडेपाच हजार रुपये क्विंटल आहे. चांगल्या दर्जाच्या तुरीची खरेदी नाफेडकडून होत असल्याने कमी दर्जा असलेल्या अथवा ज्याच्या सात-बारावर तुरीचा पेरा नोंदलेला नाही अशा उत्पादकांना तूर विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे आर्जवे करावी लागत असल्याने याचा दर मात्र, ३ हजार क्विंटलपर्यंत खाली आला आहे. याचा तुरीचा दर ३ हजारापर्यंत खाली असल्याने बाजारात डाळीचा दरही साडेपाच हजार रुपयांवरच थांबला आहे.

हरभरा पिकाची स्थितीही बिकट

तुरीची ही स्थिती असताना हरभरा पिकाची स्थितीही बिकट झाली आहे. जिल्ह्यात जिरायती बरोबर बागायती क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात हरभरा उत्पादन झाले असून सध्या चालू हंगामातील हरभरा विक्रीसाठी बाजारात मोठय़ा प्रमाणात येत आहे. हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ५० रुपये क्विंटल असताना प्रत्यक्षात खरेदी मात्र २ हजार २०० रुपयांपासून २ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार होत आहे. नाफेडकडे बुधवारअखेर केवळ १५ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.