News Flash

मुलीची छेड काढणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जत तालुक्यातील बाभुळगाव खलसा येथे एक ४०वर्षीय शेतकरी कुटुंबियांसमवेत राहात होता.

प्रातिनिधीक छायाचित्र

कोपर्डी प्रकरणाने नगरमधील कर्जत तालुका राज्यभरात गाजत असतानाच एका शेतकरी पित्याने मुलीची छेड काढणाऱ्याच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्यातीलच असलेल्या मुलाने आपल्या मुलीची छेड काढली, त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करूनही त्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी या आत्महत्येला मुलीची छेडछाड हेच कारण आहे किंवा कसे याबाबत ठोस माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

कर्जत तालुक्यातील बाभुळगाव खलसा येथे एक ४०वर्षीय शेतकरी कुटुंबियांसमवेत राहात होता. या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी तो मरण पावला. जवळचा नातेवाईक असलेल्या मुलाकडून पोटच्या मुलीची छेड काढली जात असल्याच्या कारणावरून संबंधित शेतकऱ्याने विषप्राशन केल्याचे समजते. केतन लाढाणे या तरुणाने २१ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकऱ्याच्या घरात घुसून त्याच्या मुलीला ‘तू मला आवडतेस, तुझे यावर काय म्हणणे आहे सांग’, असे सांगत तिला दरडावले होते. परंतु मुलीने आरडाओरड केल्याने केतन पळून गेला. नंतर मुलीने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. मुलीच्या भावाने केतनला जाब विचारला असता त्याने उलट त्यालाच धमकावले. अखेरीस मुलीच्या भावाने मिरजगाव पोलीस ठाण्यात केतनविरोधात फिर्याद दाखल केली. तरीही केतन संबंधित शेतकऱ्याच्या मुलीला त्रास देतच होता. शेतकरी वडिलांनीही त्याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. केतनला अटकही झाली होती. मात्र, नंतर त्याची सुटका झाली. त्यानंतरही केतनने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. अखेरीस या प्रकाराला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी केतन व त्याच्या आजोबाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलीच्या वडिलांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. त्यांच्या आत्महत्येविषयी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तशी तक्रार आल्यास त्यानुसार तपास केला जाईल, असे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवारे यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:21 am

Web Title: farmers committed suicide in karjat
Next Stories
1 यवतमाळमध्ये पित्याने आत्महत्या करून पोटच्या तीन मुलांनाही संपवले
2 दांभिकपणाला ‘प्रश्नचिन्ह’चे सडेतोड उत्तर!
3 मृतावस्थेत सापडलेल्या वाघिणीचे ३ बछडे दोन दिवसांपासून बेपत्ता
Just Now!
X