तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आíथक मदत मिळावी, यासाठी आपण जातीने प्रयत्न करीत असून वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढणार, असे आश्वासन आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी आर्णी येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. 

जवळा परिसरात गारपीट होऊन एक महिना लोटत आला असला तरी एका दमडीची मदत शासनाकडून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी मिळालेली नाही, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यांनी ही माहिती दिली. तालुक्यात अवैध व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावले असून त्यामुळे सामान्य माणूस भरभटला जात आहे. असे असतांनाही पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येते, असा सरळ प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाणेदाराविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.
आर्णी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे करीत असताना निधी खेचून आणणे मोठय़ा कसरतीचे काम झाले असले तरी आपण मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मदतीने विकासात्मक निधी मोठय़ा प्रमाणात खेचून आणू, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांमुळे काही विकासात्मक कामांसंदर्भात अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्या दृष्टीने आपण सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दाभडी या गावाला मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्याची घोषणा केली व लगेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १०८ ठराव पारित करण्यात आले. तसा विकास आराखडय़ाचा अहवालही पाठविण्यात आला. या सर्व कामांसाठी आमदार मदन येरावार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी हा अहवाल अद्याप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच नाही, असे जेव्हा आमदार तोडसाम यांनी सांगितले तेव्हा या कामात आमदार तोडसाम यांना अंधारात तर ठेवण्यात आले नाही ना? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले व ‘नो कमेंट्स’ म्हणून प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. मात्र, लगेच त्यांनी आपले ‘तात्पुरते मौन व्रत’ तोडून मुख्यमंत्री मला विश्वासात घेतल्याशिवाय माझ्या मतदार संघातील मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ संपूर्ण देशभर गाजलेल्या दाभडी या गावाचा विकास आराखडा कसा मंजूर करतील? असेही त्यांनी नमूद केले, परंतु लगेच एका पत्रकाराने जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसप्रमाणे भाजपमध्येही गटबाजी आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र आम्ही सर्व एकजूट असल्याचे प्रतिपादन केले. संपूर्ण आर्णी तालुक्याच्या विकासासाठी आमदार म्हणून कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला प्रा. विनीत माहुरे व भाजपचे शहराध्यक्ष अशोक येरावार प्रामुख्याने उपस्थित होते.