आधीच करोनाकाळ, त्यात कृषी विभागावर हलगर्जीचे आरोप
रमेश पाटील, लोकसत्ता
वाडा: भातशेतीला पूरक व्यवसाय म्हणून पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून तलाव खोदले आहेत. या तलावांमध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानाने मत्स्यबीज पुरवले जाते, मात्र या वर्षी पावसाचे तीन महिने संपून गेले तरी अजूनपर्यंत कृषी विभागाने वाडा, जव्हारमधील शेतकऱ्यांना या मत्स्यबीजाचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेकडो मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे.
येथील पारंपरिक भातशेती व्यवसाय डबघाईस आल्याने अनेक शेतकरी कुक्कु ट, शेळी, मत्स्यपालन असे शेती पूरक व्यवसायात उतरले आहेत. जलशिवार योजने अंतर्गत गेल्या पाच वर्षांत पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कृषी विभागाने शंभर टक्के अनुदानाने तलाव खोदून दिलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वत: मोठमोठे तलाव खोदून या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केलेला आहे.
कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण बाब उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी येथील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाने रोहू, कटला, मृगळ अशा विविध जातींचे मत्स्यबीज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पुरविले जाते. मात्र या वर्षी सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी वाडा, जव्हार तालुक्यातील मत्स्यपालन शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचा पुरवठा करण्यात आलेला नाही.
विक्रमगड व मोखाडा तालुक्यात हे मत्स्यबीज तीन दिवसांपूर्वी (१४ सप्टेंबर) देण्यात आले असून तेही फक्त १०० डब्बे आल्याने प्रति शेतकऱ्यांना फक्त दोन डबे वाटप करण्यात आले आहेत. येथील शेतकऱ्यांना मत्स्यपालनामधून दरवर्षी खर्च वजा करता दोन ते अडीच लाख रुपये मिळत असतात. या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत इतर व्यवसायावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला असल्याने मत्स्यपालन व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल अशा अपेक्षेत शेतकरी असताना त्यांना वेळेवर मत्स्यबीज उपलब्ध न झाल्याने या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
शेतकऱ्यांची विवंचना
अनेक शेतकऱ्यांच्या तलावातील पाणीसाठा हा डिसेंबर अखेपर्यंत आटून जातो, त्यामुळे तब्बल तीन महिने उशिरा आलेल्या या मत्स्यबीजाची अवघ्या तीन महिन्यांत वाढ कशी होणार या विवंचनेत विक्रमगड व मोखाडा तालुक्यातील शेतकरी अडकले आहेत. तर कृषी विभागाकडे वारंवार मागणी करूनही मत्स्यबीज वेळेवर उपलब्ध न झाल्याने काही शेतकऱ्यांनी अधिक दर देऊन कलकत्ता येथून मत्स्यबीज आणून तलावात सोडले आहे. तर वाडा, जव्हार तालुक्यातील अनेक शेतकरी कृषी विभागाकडून अनुदानाने मिळणाऱ्या मत्स्यबीजाची वाट पाहत आहेत.
मत्स्यसंवर्धन केंद्राचा अभाव
पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे शासनाने सुरू केलेले मत्स्यसंवर्धन केंद्र गेल्या काही वर्षांपासून बंद पडल्याने अलिबाग, कलकत्ता येथील मत्स्यसंवर्धन केंद्रातून मत्स्यबीजाचा पुरवठा करण्यात येत आहे. दापचरी येथील बंद पडलेले मत्स्यसंवर्धन केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील मत्स्यपालन शेतकऱ्यांनी केली आहे.
अनुदान गेले कुठे
आत्मा योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण बाब म्हणून शंभर टक्के अनुदानाने शेतकऱ्यांना पुरवले जाते. मात्र सोमवारी (१४ सप्टेंबर) विक्रमगड येथे वाटप करण्यात आलेल्या या मत्स्यबीजासाठी शेतकऱ्यांकडून प्रति डब्यासाठी १६० रुपयांची आकारणी केली गेली. असे विक्रमगडमधील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. १८० डब्यांची मागणी असताना फक्त १०० डबे विक्रमगड मध्ये आल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना दोन डबेच मत्स्यबीज देण्यात आले आहे. शंभर टक्के अनुदानाने मिळणारे हे मत्स्यबीज कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत आहे.
अपुरा कालावधी
मत्स्यबिजाची योग्य वाढ होण्यासाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो, मात्र उशिरा मत्स्यबीज उपलब्ध झाले आणि तलावाचे पाणी कमी झाल्यास या मत्स्यबीजाची योग्य वाढ होणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.
मत्स्यबीज पुरविण्याची जबाबदारी कृषी विभागाची नाही, मत्स्यसंवर्धन केंद्रातून शेतकऱ्यांनीच मत्स्यबीज उपलब्ध करावयाचे आहे.
– मिलिंद जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, वाडा.
पावसाळ्यात मत्स्यबीजाची योग्य वाढ होत असते, मात्र पावसाचा हंगाम संपला तरी अजूनपर्यंत मत्स्यबीज उपलब्ध झालेले नाही.
– स्वप्निल ठाकरे, मत्स्यपालन शेतकरी, वावेघर, ता. वाडा