किमान आधारभूत किमतीने शेतीमालाची खरेदी होत नसल्याने संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयात वखार महामंडळाच्या शासकीय खरेदी केंद्रात जिल्हा उपनिबंधक सुधाकर क्षीरसागर, जिल्हा विपणन अधिकारी चव्हाण व केंद्रप्रमुख विनोद मारमवार या तिघांना गोदामात कोंडून चाबकाने मारहाण केली. या प्रकरणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे यांच्यासह १५जणांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी एकच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली.
बाजार समितीत तूर व हरभरा खरेदीत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी शेतीमाल शासकीय खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन संघटनेने केले होते. वखार महामंडळाच्या गोदामावर असलेल्या शासकीय खरेदी केंद्रात मंगळवारी काही शेतकऱ्यांनी तूर व हरभरा विक्रीसाठी आणला. या वेळी शिंदे व संघटनेचे काही कार्यकत्रे उपस्थित हाते. शासकीय खरेदी केंद्रावर जिल्हा विपणन अधिकारी चव्हाण व केंद्रप्रमुख मारमवार यांच्याशी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. शेतकऱ्यांना जाचक अटी लावून तुम्ही शेतीमाल खरेदी करण्याचे टाळता, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. बाचाबाची वाढत गेल्याने जिल्हा उपनिबंधक क्षीरसागरही  आले.
या वेळी शेतकऱ्यांना सात-बारा व इतर कागदपत्रे मागितली गेली. त्यावर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हे तुम्ही आधीच कळवायला पाहिजे, असे सांगत गोंधळ सुरू केला. अधिकाऱ्यांनी माल घेण्यास नकार देताच शेतकरी संतप्त झाले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी क्षीरसागर, मारमवार व चव्हाण यांना गोदामात कोंडून सोबत आणलेल्या चाबूक व दंडुक्याने जबर मारहाण केली. मारहाणीत तिघांनाही चांगलाच मार लागला. या प्रकारानंतर उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर यांच्यासह क्षीरसागर व त्यांचे सहकारी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. मारमवार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माल खरेदी करताना निकष का लावता, या कारणावरून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष िशदे व त्यांच्या १५ सहकाऱ्यांनी गोदामात कोंडून मारहाण केली. खिशातील पसेही काढून घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे.