भाजीपाल्याचे भाव कोसळल्याने सरकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शिरसगाव (ता.श्रीरामपूर) येथील शेतकरी नितीन गवारे यांच्या टोमॅटोच्या पिकात शेळ्या व मेंढय़ा सोडून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

शिरसगाव येथील नितीन गवारे हे पदवीधर असून गेल्या पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. दहा वर्षांपासून ते टोमॅटोचे पीक घेतात. यावर्षी त्यांच्या शेतात टोमॅटो, भोपळा, वांगी हा भाजीपाला लावलेला आहे. मात्र सध्या भाव नाही. एक रुपया किलोने टोमॅटो विकला जातो. तोडणीला सव्वा रुपये किलो खर्च येतो. त्यामुळे तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघू शकत नाही. सध्या वांगीदेखील एक रुपया किलोने विकली जात आहेत. हा आतबट्टय़ाचा धंदा बंद करण्यासाठी आता गवारे यांनी टोमॅटोच्या पिकात शेळ्या व मेंढय़ा सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आज सकाळी १० वाजता शेकडो शेतकरी गवारे यांच्या शेतावर जमले. यावेळी  गवारे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून भाजीपाल्याचे दर कोसळले. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे. भाजीपाला निर्यात बंद पडली आहे. दरवर्षी पाकिस्तानला टोमॅटो निर्यात होतो. मात्र आता ही निर्यात बंद झाली आहे. शेती करणे ही काळ्यापाण्याची शिक्षा वाटू लागली आहे.

आज तरुण वर्ग प्रयोगशील शेती करतो. पण नैसर्गिक संकटापेक्षा सुलतानी संकट मोठे आहे. त्यातूनच आजची दर घसरण सुरू झाली. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे कारणीभूत आहेत. त्यामुळेच निषेधासाठी हा अभिनव आंदोलनाचा मार्ग अवलंबिल्याचे त्यांनी सांगितले.

गवारे यांनी सरकारी कर्मचारी, शहरी लोक यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते पण एकही सरकारी कर्मचारी या आंदोलनाकडे फिरकला नाही.

तहसीलदारांना निवेदन नाही

आज शिरसगाव येथे शेतात शेळ्या-मेंढय़ा सोडण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर पोलीस ठाण्यातून गवारे यांना दूरध्वनी आला. आंदोलनाला परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कारवाई करण्यात येईल. तहसीलदारांना तुम्ही का कळविले नाही, अशी विचारणा केली. त्यावर गवारे यांनी माझ्या मालकीची जमीन आहे. त्यात मी शेळ्या-मेंढय़ा सोडणार असताना परवानगीची गरज काय? असा सवाल त्यांनी केला. सरकारकडे काही मागण्यासाठी नाही तर समाजाला जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. त्यामुळे तहसीलदारांना निवेदनदेखील देणार नाही, असे गवारे यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांची मने हेलावली

नितीन गवारे यांच्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ईश्वरी या ११ वर्षांच्या मुलीने केलेल्या भाषणाने  शेतकऱ्यांची  मने हेलावली. शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याने शाळेतून आल्यानंतर आम्ही मदत करतो. भाजीपाला धुतो, भाव नसल्याने वडिलांकडे कशाचा हट्ट धरत नाही. आमच्या इच्छाआकांक्षा या माराव्या लागतात, असे तिने सांगितल्यानंतर अनेकांना अश्रू आवरता आले नाही.