पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवडय़ापासून कमी अधिक प्रमाणात सुरू झालेला पाऊस गेल्या दोन दिवसापासून अखंडित कोसळत आहे. या मृगधारेने बळीराजा सुखावला असून शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही भागामध्ये सतत पाऊस कोसळत असल्यामुळे धान पेरणी रखडलेली आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामात पावसाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अखेपर्यंत रडविले होते. यावर्षी हवामान खात्याने सरासरीपेक्षा आठ ते दहा टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला, परंतु खरीप हंगामाची सुरुवात यंदा दमदार पावसाने झाली आहे. २२ जूनला पहाटे ५ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वाचीच वाताहत झाली. आजपासूनच शाळेची पहिली घंटा वाजली. मात्र, पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अगदी नगण्य असल्याचे दिसून आले. देवरी तालुक्यात रविवारी सायंकाळपासूनच पाऊस असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे लहान कालवे, नाल्या तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. शेतातील बांध्यातही पाणी साचले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीची कामे लांबणीवर टाकावी लागली. रविवारी दुपारपासून जिल्ह्यात सर्वदूर विजांचा कडकडाट व वादळासह पाऊस कोसळला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला असून धान नर्सरी तयारीला वेग येत आहे. अनेक शेतकऱ्यांचा कल यांत्रिक शेतीकडे असल्यामुळे ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी, नांगरणी करीत आहेत. मजुरांचे भावही गगनाला भिडले असून २०० ते २५० रुपये प्रतिदिवस मजुरी मोजावी लागत आहे, तर ट्रॅक्टरच्या नांगरणीसाठी प्रतितास ६०० रुपये दर आकारण्यात येत आहेत. बाजारात धानाचे भाव कमी असले तरी या तुलनेत बियाण्यांचे भाव तीन ते चार पट अधिक असल्याने शेतकरी संशोधित व संकरित बियाण्यांपेक्षा स्वत:कडील बियाणे पेरणीलाच प्राधान्य देत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सुमारे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जात आहे.