17 October 2019

News Flash

नांदेडमधील थुगावात शेतीच्या वादातून पिता-पुत्राची हत्या

संतप्त जमावाच्या हाणामारीत १६ जण जखमी

( प्रतिकात्मक छायाचित्र )

शेतीच्या वादातून भावकीतील दोन गटांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. या सगळ्या प्रकारात आनंदराव उमाजी भोसले आणि श्याम आनंदराव भोसले हे दोघे वडिल आणि मुलगा जागीच ठार झाले. तर इतर १६ जण जखमी झालेत. १६ जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या सगळ्या जखमींवर नांदेडच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जमिनीच्या वादातून पिता-पुत्राची हत्या झाल्याची धक्कादायक घटना थुगावात घडली.

नांदेडपासून काही अंतरावरच असलेल्या थुगाव या ठिकाणी शनिवारी ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. थुगाव शिवारातील सर्वे क्रमांक ११९ मधील शेतजमिनीवरून भोसले कुटुंबात अनेक वर्षांपासून वाद होता. २०१२ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी २३ सप्टेंबरच्या सकाळी साडेदहाच्या सुमाराला नामदेव भोसले, दिगंबर भोसले, आनंदा भोसले, शिवाजी भोसले असे दोन गट समोरासमोर आले.

या दोन्ही गटांमध्ये सुरूवातीला बाचाबाची आणि वादावादी झाली, त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर एकमेकांवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला. ज्यामुळे १६ जण या हाणामारीत जखमी झाले. तर आनंदराव भोसले (वय ६५) आणि त्यांचा मुलगा श्याम भोसले(वय ३६)हे दोघे जागीच ठार झाले.  तर मारोती भोसले,आनंंदा भोसले, शंकर भोसले, सूरज भोसले, प्रयागबाई भोसले, शीला भोसले, शुभम भोसले, गयाबाई भोसले, प्रकाश भोसले, बायनाबाई भोसले, मंजुळा भोसले. दिगंबर भोसले हे सगळेजण जखमी झाले. यापैकी आनंदा भोसलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे थुगावात तणावाचे वातावरण आहे. ज्या वडिल मुलाची हत्या करण्यात आली त्यांचे मृतदेह सरकारी रूग्णालयात आणण्यात आले आहेत. तरीही या सगळ्या प्रकाराबाबत तक्रार देण्यास अजून कोणीही पुढे आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ज्या रूग्णालयात जखमींना दाखल केले आहे तिथे जाऊन माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

First Published on September 24, 2017 9:42 pm

Web Title: father and son murdered by land dispute by mob in thugav nanded
टॅग Land Dispute,Murder