वार्ताहर, गोंदिया : १८ महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून करण्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पाण्डे यांनी मुलीचे वडील व आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

गोसे येथील रहिवासी डाकराम घोरमोडे याचे लग्न मनीषासोबत सन २०१४ मध्ये झाले. १५ जून २०१५ रोजी मनीषाने मुलीला जन्म दिला. डाकरामला ही गोड बातमी देण्यात आली. मात्र  मुलगा न झाल्याने तो नाराज होता. त्यामुळे तो मुलीला पाहण्यासाठी गेला नाही. मुलगी १८ महिन्यांची झाल्यावरही त्याने पत्नीला  घरी आणले नाही. यादरम्यान दोन्ही कुटुंबातील मान्यवरांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला व मनीषा तिच्या मुलीसह ९ ऑगस्ट २०१६ रोजी सासरी परतली, परंतु डाकरामच्या मनात राग कायम होता. घटनेच्या दिवशी १ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मनीषा पाणी आणण्यासाठी बाहेर गेली असता डाकरामने पलंगावर झोपलेल्या १८ महिन्यांच्या मुलीचा गळा आवळला. नेमकी त्याचवेळी मनीषा घरी अली असता तिला डाकराम हा मुलीचा गळा दाबताना दिसला. तिने मुलीकडे धाव घेतली तेव्हा तिचे शरीर थंड पडले होते व जीभ बाहेर आली होती. तिला दवाखान्यात नेले तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. मनीषाने दिलेल्या तक्रारीवरून डाकरामला पोलिसांनी मुलीच्या हत्या प्रकरणात अटक केली. पोलिसांनी मुलीचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. त्यात मुलीचा मृत्यू गळा आवळल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारावर पोलिसांनी पुढील कारवाई करून प्रकरण न्यायालयात दाखल केले.  न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारावर डाकरामला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

सरकार पक्षातर्फे अॅड. दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यत पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार काशीराम मस्के यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.