News Flash

डाळीऐवजी चिपळुणात सापडला तेलाचा साठा

पुरवठा विभागाने केलेली रत्नागिरी जिल्ह्य़ातील ही पहिलीच कारवाई आहे.

पुरवठा विभागाच्या कारवाईने व्यापारी धास्तावले

डाळीच्या साठेबाजीविरोधात राज्यात सर्वत्र छापासत्र सुरू असताना गुरुवारी चिपळुणात पुरवठा विभागाच्या पथकाने चिपळूण एमआयडीसीतील गोदामावर छापा टाकला असता खाद्य तेलाचा सुमारे ४६ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. पुरवठा विभागाने केलेली रत्नागिरी जिल्ह्य़ातील ही पहिलीच कारवाई आहे. ऐन दीपावलीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
चिपळुणातील मोठे होलसेल किराणा व्यापारी असणारे केशर आप्पाजी ओक पेढीच्या खेर्डी एमआयडीसीतील गोदामामध्ये मोठय़ा प्रमाणात तेलसाठा असल्याची कुणकुण तहसीलदार वृषाली पाटील यांना लागली होती. त्यानंतर पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन पाटील यांनी छापा मारला असता, खाद्य तेल व वनस्पती तेलाचा मोठय़ा प्रमाणात साठा सापडला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
४०९३२ लीटर खाद्यतेल व २०३१२ लीटर वनस्पती तेलपुरवठा विभागाला सापडले. ओक पेढी ही होलसेल व्यापारी असल्याने त्यांना ३०० क्विंटल तेलसाठा करण्याचा परवाना आहे. छाप्यामध्ये जवळजवळ ४०० क्विंटल तेलसाठा सापडला. परवान्यापेक्षा दुपट्टीहून अधिक साठा सापडल्याने पुरवठा विभागाने ही कारवाई केली. या तेलसाठय़ाची किंमत ४५ लाख ९३ हजार ३०९ रुपये आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी याबाबत कारवाई सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारीही गोदामाजवळ तैनात करण्यात आले होते. तहसीलदार वृषाली पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या कारवाईमुळे जिल्ह्य़ातील होलसेल व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ऐन दीपावलीच्या तोंडावर कारवाई झाल्यामुळे डाळी, कडधान्य, तेल यांचा साठा करायचा की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 12:45 am

Web Title: fda find food oil procurement in chiplun red
Next Stories
1 निकृष्ट बस खरेदीमुळे पालिका परिवहनला फटका
2 बिबटय़ाचे कातडे विकण्यासाठी आणणाऱ्या चौघांना अटक
3 महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
Just Now!
X