तुकाराम झाडे

कळमनुरी तालुक्यातील करवाडी भागात रस्ता नसल्याने दोन वर्षांपूर्वी एका महिलेला प्रसूतीसाठी खाटेवरून न्यावे लागल्याच्या घटनेची दखल उच्च न्यायालयाने घेत येथे तातडीने रस्ता तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रस्ता मंजूर करण्यात आला. पण तयार काही झाला नाही. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या भागात मंगळवारी पुन्हा दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. प्रसूतीसाठी महिलेला खाटेवरून रुग्णालयात आणावे लागले.

करवाडी गावातील सुवर्णा ढाकरे यांना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर त्यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयापर्यंत न्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हते. करवाडी ते नांदापूर हा रस्ता अजूनही चिखलमय आहे. दुचाकी व चारचाकी जाऊ शकत नाही. सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी मग पुन्हा एकदा गावकऱ्यांनी कळा सोसणाऱ्या सुवर्णा ढाकरे यांना खाटेवर टाकले. रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे  बहुतेक जणांना छत्र्या हातात घ्याव्या लागल्या. खाटेवरच्या गर्भवती महिलेला सांभाळताना ती भिजू नये याची काळजी घ्यायची, अशी कसरत करत गावकऱ्यांनी आणि नातलगांनी सहा किलोमीटरचे अंतर पार केले. नांदापूर येथे शासकीय रुग्णवाहिका आली होती. तेथून सुवर्णा ढाकरे यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तोपर्यंत दुपारचे साडेतीन वाजले होते. भरपावसात प्रसूतकळा सोसत सुवर्णा यांच्यासह नातेवाईक पोहोचले. या भागातील रस्ता तातडीने बनवावा, अशी सर्वाची मागणी होती.

गर्भवती सुवर्णाला जिल्हा रुग्णालयात घेऊन येण्यासाठी या महिलेसोबत त्यांचा भाऊ संतोष कऱ्हाळे, आशा कार्यकर्ती प्रेमला रामपोटे व तिची आई अल्काबाई कऱ्हाळे, आत्या रंगूबाई खोकले, काकू लक्ष्मीबाई कऱ्हाळे यांना सहा किलोमीटरचा चिखलमय रस्ता तुडवत यावे लागले.

हाल संपेना..

१९ सप्टेंबर २०१७ रोजी गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात आणावे लागते, या आशयाचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. ५ जुल २०१९ रोजी झालेल्या सुनावणीत, शासनातर्फे दिलेल्या उत्तरात गावासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्यासाठी एक कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. हे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण केले जाईल, असे शासनाने कळविले होते. रस्त्यासाठीची मुदत अद्याप शिल्लक असली तरी गावातले हाल काही अजून थांबलेले नाहीत.