ताडोबातील थरारक प्रसंगाचे मुकुल त्रिवेदी प्रत्यक्षदर्शी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन पट्टेदार वाघांमध्ये दुचाकीस्वार सापडल्याची चित्रफित समाज माध्यमांवर सध्या चांगलीच फिरत आहे. हे दुचाकीस्वार ‘बिट गार्ड’ होते व त्यांची सुटका ताडोबाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम २० ते २५ मिनिटांचा आहे. या घटनेत वाघांनी दुचाकीचे बेहाल केले आहे. गार्डला दुसऱ्या गाडीत घेतले नसते तर त्यांना प्राण गमवावा लागला असता, असे त्रिवेदी यांनी सांगितले. ते या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत.
त्रिवेदी म्हणाले, २८ डिसेंबरचा तो दिवस कधीच विसरू शकणार नाही. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जामनी येथून मोहुर्ली गेटकडे परत येत असताना दोन बिट गार्ड दुचाकीने परत येत होते. त्यांना मार्गात दोन वाघांनी घेरले. एक समोर तर दुसरा मागे होता. त्यामुळे बिट गार्डने गाडी तिथेच थांबवली आणि वाघ जाण्याची वाट बघू लागले. वाघ असल्याने त्यांना हलताही येत नव्हते. त्याच वेळी घटनास्थळी पोहचलो. गार्डला धीर देत, त्यांना शांतपणे एकाच ठिकाणी उभे राहण्याचा सल्ला दिला. जवळपास तीन ते चार मिनिटे वाघ तिथेच घिरटय़ा घालत होता. त्याचवेळी आपल्या गाडीतील एक कर्मचारी या संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण करीत होता. दरम्यान, वन पथकाला बोलवण्यात आले. पथक घटनास्थळी आले. तेव्हा वाघ दुचाकीच्या अगदी जवळ पोहोचला होता. काही अंतरावर तो जाताच गार्डने त्यांचे वाहन हळूहळू पुढे घेतले. बिट गार्डने त्यांची दुचाकी सोडून लगेचच दुसऱ्या गाडीत उडी घेतली. त्यावेळी वाघही त्यांच्या दिशेने धावला. मात्र, तोवर गार्ड गाडीत चढले होते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दरम्यान, शिकार हातची गेली म्हणून संतापलेल्या वाघांनी दुचाकीवर हल्ला केला. त्यात सिट, चाक, टायर सुद्धा वाघांनी फाडले. वाघ गेल्यावर दुचाकी वाहनात टाकण्यात आली. त्याचा आवाज होताच वाघ पुन्हा धावले. मात्र, तोपर्यंत संकट दूर झाले होते. हा प्रसंग पाहताना शरीरावर काटे आले होते, असे त्रिवेदी म्हणाले.
घटनेपासून बोध घेणे आवश्यक
ताडोबामधील वाघांना जिप्सीसह इतर वाहनांची सवय झालेली आहे. वाहन दिसताच ते त्या दिशेने येतात. हा प्रकार धोकादायक आहे. यातून वन कर्मचाऱ्यांसोबतच पर्यटकांनी सुद्धा बोध घेणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला या घटनेचा व्हिडीओ ४.१८ मिनिटांचा असला तरी तो प्रत्यक्षात तो १५ ते २० मिनिटांचा आहे. दैव बलवत्तर म्हणूनच दोन्ही बिट गार्ड बचावले. क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 1:58 am