सोलापूर जिल्ह्यातील ४८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर काही संवेदनशील गावांमध्ये पडसाद उमटून दोन गटात हाणामा-या झाल्या. यात वाहनांची तोडफोड, शेतातील ऊस पीक जाळणे यासारखे प्रकार घडले. बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकत्रे एकमेकांना भिडले. काही ठिकाणी िहसक जमावाला नियंत्रणात आणताना पोलीसही जखमी झाले.
माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात हाणामारी होऊन त्यात दगडफेक करण्यात आली. एक जीपगाडीही फोडण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक धावून आली. परंतु िहसक जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस फौजदार िशदे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी िहसक जमावाने कुऱ्हाडींसह अन्य हत्यारांचाही वापर केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी दोन्ही गटातील सोळाजणांविरूध्द वेळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून धरपकड चालविली आहे.
बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथे राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गावातून विजयी मिरवणूक काढली. परंतु त्यावेळी पराभवामुळे चिडलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक केली. यात आठ जण जखमी झाले. याशिवाय याच तालुक्यातील सर्जापूर, मालवंडी, हळदुगे, साकत, खांडवी, कासारी आदी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील जय-पराजयाचे पडसाद उमटून राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामा-या झाल्या. याप्रकरणी वैराग व अन्य पोलीस ठाण्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील सुपली येथे निवडणूक निकालानंतर विजयी गटाच्या समर्थकांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. परंतु फटाके फोडताना पराभूत महिला उमेदवार प्रभावती जिजाबा जावीर यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर फटाक्यांच्या ठिणग्या पडून आग लागली. यात संपूर्ण गोठा जळाला. याप्रकरणी सात जणांविरूध्द पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथेही विजयोत्सव साजरा करताना फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे विरोधकांच्या शेताला आग लागली. यात गंगाराम जाधव यांच्या शेतातील १५ गुंठे ऊस जळून खाक झाला. याप्रकरणी तिघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.