किर्तनकार इंदुरीकर महाजारांवर PCPNDT च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने एक पत्र पाठवून त्याद्वारे ही मागणी केली आहे. अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे. “सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. अशुभ वेळेला स्त्री संग झाल्यास अवलाद रांगडी, बेवडी आणि खानदानाचं नाव मातीत मिळवणारी होते. रावणाचा जन्म आण प्रल्हादाचा जन्म ही दोन उदाहरणंही आहेत” असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. आता याप्रकरणी अंनिसने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

PCPNDT च्या कायद्यातील कलम २२ चे उल्लंघन असे वक्तव्य करुन इंदुरीकर महाराजांनी केल्याचं या पत्रात म्हटलं गेलं आहे. या कायद्यातील कलम २२ नुसार गर्भलिंग निदान निवडीबाबत फोन, इंटरनेट, छापील पत्रकं, एसएमएस, मेसेज यांद्वारे निवडीची जाहिरात करण्यास बंदी आहे. एवढंच नाही तर इंदुरीकर महाराजांनी “टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब” असं म्हणून स्त्रियांचाही अपमान करणारं वक्तव्य केल्याचीही बाब या पत्रात नमूद आहे. ११ फेब्रुवारीला ही बाब समोर आली होती. तेव्हापासून हा वाद सुरु झाला. आता अंनिसनेही इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ओझर या ठिकाणी केलेल्या किर्तनाचा तो व्हिडीओ होता. त्यामध्ये त्यांनी ‘सम तिथीला स्त्री संग झाल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग झाल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर बराच वाद निर्माण झाला. PCPNDT अन्वये त्यांना नोटीसही बजावण्यात आली. दरम्यान यासंदर्भात इंदुरीकर महाराजांना विचारलं असता दोन तासांच्या किर्तनात अशी चूक होऊ शकते. घडल्या गोष्टीचा मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. आता वाद शमला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. मात्र हा वाद थांबताना दिसत नाहीये. कारण आजच इंदुरीकर महाराजांवर त्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.