बोईसर: तारापूर स्फोटातील मृतांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांना तब्बल १४ तासानंतर राजापूर पोलिसांनी सोडले आहे. अगोदरच दुखाचा कोसळलेला डोंगर, त्यात टाळेबंदीची शिक्षा यामुळे सात लोकांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना विलगीकरण करत ग्रामीण रुग्णालयात ठेवले होते. आरोग्य विभागाने सर्व तपासण्या पूर्ण करून त्यांना रात्री उशिरा सोडल्यानंतर १२ तासाचा प्रवास करत सर्व लोक बोईसरमध्ये सुखरूप पोचले आहेत.

टाळेबंदीमध्ये झालेल्या कारखान्यातील स्फोटात तारापूर हादरले होते. यात जागीच मृत्युमुखी पडलेल्या विजय सावंत यांचे पार्थिव त्यांच्या गावी सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथे नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक बोईसरहून निघाले होते.

मात्र कुडाळ येथे मंगळवारी सकाळी पोलिसांनी वाहन थांबवून मयताचे पार्थिव व इतर दोन लोकांना सोबत पाठवले व इतर लोकांना माघारी जाण्यासाठी सांगितले. बोईसरहून निघालेल्या रुग्णवाहिकेसोबत असलेले वाहन बोईसरपासून कुडाळपर्यंत सर्व तपासणी नाक्यावर सोडण्यात आले होते. यातच पार्थिवासोबत जाणाऱ्या सर्वाची वैद्यकीय तपासणी करून नंतर ते बोईसर भागातून निघाले होते. तरी देखील त्यांना कुडाळ येथे अडवून माघारी परतण्यासाठी सांगितले, त्यानुसार एका वाहनामध्ये मयताचे नातेवाईक असलेले सात लोक माघारी परतत असताना त्यांना राजापूरमध्ये टोल नाक्यावर सकाळी ८:३० वाजता अडविण्यात आले होते.

राजापूर ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून १४ दिवस विलगीकरण करणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारची करोना लक्षणे नसताना अडवणूक होत असल्याने त्यांना सोडण्यासाठी पालघर खासदार राजेंद्र गावित यांनी पोलीस प्रशासनाला संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार रात्री नऊ  वाजता कागदपत्रांची पूर्तता करून तब्बल १४ तासानंतर राजापूर पोलिसांनी त्यांना सोडले. त्यानंतर १२ तासाचा प्रवास करून सात जण सकाळी नऊ  वाजता बोईसरमध्ये पोचले.