ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेलं अ‍ॅमेझॉन अ‍ॅप आता मनसेच्या इशाऱ्यापुढे नमलं आहे. कारण अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. अ‍ॅमेझॉन ही ऑनलाइन शॉपिंगसाठीची एक महत्त्वाची ई कॉमर्स कंपनी आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपने मराठी भाषेचा समावेश केला आहे. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खटॅकचा इशारा दिल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियाने नमतं घेतलं आहे. यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश करण्यास संमती दिली आहे. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या इमेलची दखल घेतली आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी २० दिवस लागणार आहेत.

मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश करण्याबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या इमेलला कंपनीने उत्तर दिलं होतं. त्यानंतर एक बैठकीही झाल्या. या ईमेलचा स्क्रिन शॉट अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. जेफ बेझोस आपला इमेल मिळाला आहे, अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला याची माहिती दिली आहे असे अ‍ॅमेझॉनच्या वतीने कार्तिक यांनी लिहिलं आहे. अ‍ॅमेझॉन डिजिटल सेवेत मराठी भाषेला प्राधान्य द्या या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनीही दखल घेतली आहे. “राजसाहेब म्हणतात तसं तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं” असं वाक्य अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही इ कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अन्यथा मनसे या दोन कंपन्यांची दिवाळी मनसेच्या पद्धतीने साजरी करेल असा इशारा १५ ऑक्टोबरला देण्यात आला होता. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी नमतं घेतलं आहे.