कराड : चिमुरडय़ा अर्चनाच्या हाताची दहाही बोट चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याच्या घटनेला १५ वर्षे लोटली. पण, या पंगुत्वाचे रडगाने न करता अर्चनाने मोठय़ा जिद्दीने ‘जळाली दहाही बोटं तरी कार्यभार पेलती माझी दोन्ही मनगटं’ या धर्याने शालेय शिक्षणात आघाडीच घेतली. सध्या सावित्रीची ही लेक दहावीच्या परीक्षेचे पेपर दोन्ही मनगटांमध्ये पेन धरून लिहित आहे. तिने एसएससी बोर्डाच्या सुविधेनुसार सहायकाचा मिळणारा हातभारही नाकारून आपल्या ठाम आत्मविश्वासाचा पाढाच समाजासमोर ठेवला आहे.

पाटण मतदारसंघातील मोरणा विभागातील डोंगरी भागामध्ये वसलेल्या गवळीनगर- कोकीसरे (ता.पाटण) या लहानशा लोकवस्तीमध्ये सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कु. अर्चना यमकर हिचे आईवडील तिच्या लहान भावंडांचे आधारावर सोडून मजुरीकरीता घराबाहेर गेले असताना चुलीच्या निखाऱ्यात अर्चना हिची दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झाल्याने लहानपणापासून ती गंभीर दुखापत घेऊन तसेच तिचे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील एवढय़ा कठीण परिस्थितीत परिस्थितीशी झगडत ती शिक्षण घेत आहे. हाताला बोटे नसतानाही इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण ती यावर्षी पूर्ण करीत असून सध्या सुरु असलेले दहावीचे पेपर ती आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट असून यातून तिची शिक्षणाची आवड, तळमळ व जिद्दीचे दर्शन घडून येत आहे. अशाच शिक्षणाची आवड आणि तळमळ असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणाकरता कै. सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना एक आधार म्हणून काम करीत आहे. कु. अर्चना हिच्या या परिस्थितीची माहिती सोशल मीडियावरुन सर्वाना माहिती झाल्यानंतर तिच्या या जिद्दीची सर्व स्तरातून  वाहवाह केली जात असून, तिला सर्वोत्तोपरी मदत करण्याची सर्वानी भूमिका घेतली आहे ही आनंदाची बाब आहे. आमदार शंभूराज देसाई यांनीही कु.अर्चना हिचे दहावीचे पेपर संपलेनंतर तिची व तिच्या आईची भेट घेऊन तिला पुढील आयुष्याकरता लागणारी सर्वोतोपरी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तसे त्यांनी आश्वासन देखील दिले असून त्याअगोदर आमदार शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली  कै. सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कु. अर्चना सिधु यमकर हिच्या इयत्ता दहावीनंतरच्या पदवीपर्यंतच्या संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षणाचा भार हा वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेतून पेलण्याचा निर्णय घेतला आहे.