आगग्रस्त सिनाळा कोळसा खाणीला सील ठोकण्यात आले असून दोन महिन्याच्या कालावधीसाठी ही खाण बंद करण्यात येणार असल्याने वेकोलिचे कोटय़वधीचे नुकसान होणार आहे. दरम्यान, खाण सुरक्षा महासंचालकांच्या तीन सदस्यीय पथकाने खाणीची पाहणी करून आगग्रस्त भागात हवा जाऊ नये म्हणून सिमेंट- विटांनी पक्की भिंत बांधण्यात आली, तसेच या खाणीतील ५०० कामगारांना जवळच्या खाणीत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या खाणीला शनिवारी पहाटे विषारी वायूच्या गळतीमुळे आग लागली तेव्हा शंभर कामगार खाणीत काम करीत होते. या साऱ्यांना वेकोलिच्या मदत पथकाने सुखरूप बाहेर काढले. मात्र, यातील ९१ कामगारांच्या नाकातोंडात गॅस व धूर गेल्यामुळे जवळपास २५ कामगार बेशुध्द पडले होते. त्यांना दोन रुग्णालयांमध्ये  दाखल करण्यात आले. सुदैवाने आग वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या आगीची पाहणी करण्यासाठी आज वेकोलिच्या नागपूर विभागाच्या खाण सुरक्षा महासंचालकांच्या तीन अधिकाऱ्यांचे पथक येथे आले. वेकोलिचे नागपूर विभागाच्या विश्वास व अन्य दोन अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. या पथकाने आगग्रस्त भागाची पाहणी करून पुन्हा त्याच ठिकाणी आग लागू नये व तेथे हवा खेळती राहू नये म्हणून सिमेंट-विटांची पक्की भिंत बांधून आगग्रस्त ठिकाण व सिनाळा खाणीलाही सील ठोकले. किमान दोन महिने ही खाण बंद राहणार असल्याने वेकोलिचे कोटय़वधीचे नुकसान होणार आहे.
कालच्या आगीतही शेकडो टन कोळसा जळाल्याने ही हानी कोटय़वधीची असल्याची माहिती वेकोलिच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, या आगीबद्दल वेकोलिचे अधिकारी काहीही बोलायला तयाार नाहीत. या खाणीत ५०० कामगार होते. सलग दोन महिने ही खाण बंद राहणार असल्याने या कामगारांना जवळच्या खाणीत हलविण्याचा निर्णय वेकोलि व्यवस्थापनाने घेतला आहे. या आगीची संपूर्ण चौकशी होईस्तोवर ही खाण बंद राहणार असली तरी वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा सर्व प्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्रपाळीतील कामगारांनी खाण व्यवस्थापकाला विषारी वायूच्या गळतीची माहिती दिली होती, परंतु याकडे दुर्लक्ष करून कामगारांना खाणीत पाठविण्यात आले. लोकसभेच्या कोळसा, खाण व पोलाद समितीचे अध्यक्ष खासदार हंसराज अहीर यांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. कामगारांनी माहिती दिल्यानंतरही त्यांना खाणीत का सोडण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. दरम्यान, सत्य समोर येऊ नये म्हणून वेकोलिचे अधिकारी धडपडत आहेत. क्षेत्रीय महाव्यवस्थापक रमाकांत मिश्रा तर पत्रकारांना साधी माहिती देण्यासही तयार नाहीत.
जिल्हाधिकाऱ्यांपासूनही त्यांनी माहिती दडविण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर यांना आग लागल्याचे कळताच ते स्वत: घटनास्थळी दाखल झाले. यावेळीही वेकोलिचे अधिकारी जिल्हा प्रशासनापासून अनेक बाबी लपवित असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. दरम्यान, चौकशी समितीत आगीचे नेमके कारण समोर येणार असले तरी सध्या वेकोलिला प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
ईश्वर कृपेनेच आमचा पुनर्जन्म
या घटनेत बेशुध्द पडलेल्या ९१ कामगारांना आज वेकोलिच्या एरिया हॉस्पिटल व श्री साई डिवाईन क्युअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली. या साऱ्यांची प्रकृती ठीक असून मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बचावल्याचा आनंद त्यांच्यासह कुटुंबीयांच्याही चेहऱ्यावर बघायला मिळाला. केवळ ईश्वर कृपेनेच आमचा पुनर्जन्म झाला, अशी प्रतिक्रिया सर्वानी व्यक्त केली. खाणीत आगीचे लोळ सर्वत्र पसरत असल्याने ते जीव वाचविण्यासाठी खाणीच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या दिशेने धावत सुटले. अशातच वेकोलिच्या मदत पथकाने या कामगारांना सुखरूप बाहेर काढून या दोन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. बहुतांश कामगार बेशुध्दावस्थेत व काहींना श्वास घेण्यास त्रास होत होता. उपचारानंतर त्यांना आज दुपारी सुटी देण्यात आल्यावर त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.