अहमदनगर शहरातील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला भीषण आग लागली. या आगीत अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. आज (रविवार) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी त्वरीत रवाना झाल्या. फायबर, प्लास्टिकमुळे आगीचा भडका उडाला असून परिसरात धुराचे लोट निघत आहेत. दरम्यान, शिल्पकार कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना आपण पूर्णपणे उद्धवस्त झाल्याची प्रतिक्रिया दिली. कांबळे यांना मानसिक धक्का बसला असून त्यांना रूग्णालयात हलवण्यात आल्याचे कळते. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

अहमदनगर शहरातील भिस्त बाग परिसरात शिल्पकार कांबळे यांचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत कांबळे हे शिल्प तयार करतात. आज दुपारी अचानक स्टुडिओला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. स्टुडिओत शिल्पासाठी असलेल्या फायबर आणि प्लास्टिकमुळे आगीचा भडका उडाला. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट निघत होते. आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी असून त्यांच्याकडून आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत कांबळे यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. प्रमाणपत्रं, साहित्य आणि अनेक शिल्प जळून खाक झाली आहेत. यात लाखो रूपयांची हानी झाली आहे.