|| दिगंबर शिंदे

फटाक्यांमुळे जायबंदी होणाऱ्या पाखरांच्या संख्येत यंदा मोठी घट

सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेले निर्बंध आणि बाजारात असलेली मंदी यंदा पाखरांना इष्टापत्ती ठरली असून सांगलीत फटाक्यामुळे जायबंदी झालेल्या पाखरांची संख्या अवघी सातवर आली असून, दोन पारव्यांसह तीन पक्षी प्राणाला मुकले आहेत. गेल्यावर्षी हीच संख्या ४८ वर होती.

गेल्या काही वर्षांपासून फटाक्यामुळे होणाऱ्या वायू व ध्वनिप्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीमुळे आतषबाजीच्या प्रमाणात हळूहळू घट होत होती. यातच यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्चित करून दिली. या र्निबधाच्या जोडीनेच ‘जीएसटी’च्या वाढीव करामुळे यंदा फटाक्यांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या. या साऱ्यांमुळे यावर्षी दिवाळीत फाटके उडवण्याच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात घट झाली.

सांगली शहरात आंबेडकर स्टेडियम, राजमती क्रीडांगण आणि मिरज शहरातील हायस्कूलचे मदान या ठिकाणी फटाके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते. मात्र यंदा नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानावेळी फटाक्यांचा आवाज क्षीण झाला होता. लक्ष्मीपूजनावेळी व्यापारी पेठेत पूजनानंतर बराच काळ फटाक्यांची आताषबाजी चालत होती. यंदा न्यायालयाच्या वेळेच्या बंधनामुळेही मर्यादा आलीच, पण याचबरोबर व्यापारी वर्गाला आर्थिक मंदीचा फार मोठा फटका यंदाच्या दिवाळीत बसला.

दिवाळी सणाच्या निमित्ताने अगोदर आठ-दहा दिवस किराणा मालाच्या खरेदीसाठी असणारी गर्दी अखेरच्या टप्प्यात १ नोव्हेंबरनंतर अवघी तीनचार दिवसच दिसून आली. बहुसंख्य लोकांनी तयार फराळालाच पसंती दिल्याने व्यापारी पेठेत मंदीच जाणवली. सामान्य नागरिकही बोनस, बक्षिसी न मिळाल्याने या कमाईत होत असलेल्या फटाके खरेदीला फाटा देत केवळ औपचारिकता म्हणून फटाका खरेदी करीत असल्याने उलाढाल कमी झाली.

याचा परिणाम होउन यंदा शहरात फटाक्याने केवळ ७ पक्षी  (कोकिळा १, डोव १, पारवे ३, साळुंखी १ आणि वटवाघूळ १) जायबंदी झाले. यापकी २ पारवे आणि एक वटवाघूळ प्राणाला मुकले असल्याचे पक्षावर उपचार करणाऱ्या इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी दिवाळीतील फटाक्याच्या आताषबाजीचा ४८ पाखरांना फटका बसला होता. यापकी १४ पाखरे प्राणाला मुकली होती, तर ३४ पक्षी जायबंदी झाले होते असे मुजावर यांनी सांगितले.