नांदेड : हिंदी भाषेत फोन का उचलत नाहीत, असं म्हणत गोळीबार करून दशमेशनगर येथील आरतीया कॉम्प्लेक्समधील इंदरपालसिंघ भाटिया यांच्या कार्यालयातून काही रक्कम लुटून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मंगळवारी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरतीया कॉम्प्लेक्समध्ये इंदरपालसिंघ भाटिया यांचे कार्यालय असून ते नेहमीप्रमाणे कामकाजात व्यस्त होते. या दरम्यान तोंडाला बांधलेल्या अवस्थेत दोन पिस्तूलधारी त्यांच्या कार्यालयात घुसले. त्यापैकी एकाने हिंदीमध्ये भाई का फोन क्यू नही उठाता. भाई बात करणा चाहते है. भाई का फोन उठा असे म्हणत एक गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी भिंतीवर जाऊन धडकली. गोळीबारामुळे कार्यालयातील कर्मचारी भयभीत झाले. तेवढय़ात पिस्तूलधारी दोघांनी भाटिया यांच्या टेबलातील काही रक्कम घेऊन पळ काढला. सोमवारी या घटनेची वाच्यता कुठेही झाली नाही; परंतु मंगळवारी मात्र गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली.

इतवारा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, शिवाजी डोईफोडे हे फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले होते; परंतु भाटिया यांनी भीतीमुळे सुरुवातीला तक्रार देण्यासही नकार दिला. शेवटी पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांनी रितसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

मागील काही दिवसांत शहरातील मोठे व्यापारी, कंत्राटदार व व्यावसायिक यांना फोन करून खंडणी मागणे व गोळीबाराच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. हॉटेल मालक सुरेश राठोड, हार्डवेअरचे व्यापारी आशिष पाटणी यांच्यावर गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर काँग्रेस नेते गोविंद कोकुलवार यांच्यावरही गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. यापूर्वी प्रसिद्ध डॉक्टर मनिष कत्रुवार यांनाही भाईने भेजा है, असे म्हणत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या गोळीबारांच्या मागे कुख्यात हरिवदरसिंघ उर्फ रिंधा असल्याचे या पूर्वीच पोलिसांनी स्पष्ट केले आहे.