जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. क्रिकेटच्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हल्लेखोराचा नेम चुकल्याने कुलभूषण पाटील हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रविवारी दुपारी खोटेनगर परिसराजवळील मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत यांच्यात क्रिकेट खेळण्यावरुन जोरदार वाद झाला. उपमहापौर कुलभूषण पाटील मध्यस्थी करत हा वाद सोडवण्यासाठी गेले होते. पोलीस स्टेशनमध्ये नेत समजून काढत दोन्ही गटांना पाठवण्यात आलं होतं. मात्र काही वेळाने इनोव्हा कारमधून आलेल्या चौघांनी रस्त्यावरच कुलभूषण पाटील यांना अडवलं आणि भांडणात मध्यस्थी का केली अशी विचारणा करत मारहाणीचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यातील एकाने कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केला. मात्र त्याचा नेम चुकला आणि कुलभूषण पाटील बचावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घरासमोर आणि त्याच्या आधी सोमानी मार्केट स्टॉप येथे काहीजणांना त्यांना अडवून आणि नंतर पाठलाग करुन गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उपमहापौरांनी पोलीस स्टेशनला जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एका गटाची नाराजी होती आणि त्यातून गोळीबार झाल्याचं फिर्यादी आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे”. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.