|| अशोक तुपे

 

राजकारणात नेते शब्द देतात, पण तो पाळतातच असे नाही. यापूर्वी नगरच्या राजकारणात असे अनेकदा घडले. त्यामुळे अनेकांची मंत्रिपदाची संधीही हुकली. मात्र पहिल्यांदाच शिवसेनेचे कार्याध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. नगरच्या दोन दिग्गज राजकीय घराण्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे.

राज्याच्या राजकारणात माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात. खासदार, दोनदा आमदार असलेल्या गडाख यांनाही अनेकदा मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली. राज्यात गाजलेल्या माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे व गडाख या निवडणूक खटल्याच्या निकालामुळे त्यांना राजकीय किंमत मोजावी लागली. ते सहा वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले होते. पवार यांच्या निष्ठेपायी त्यांनी विखे यांच्याशी राजकीय वैमनस्य घेतले होते. २००९ च्या निवडणुकीत माजी खासदार गडाख यांनी राजकीय निवृत्ती घेतली व चिरंजीव शंकर गडाख यांना उभे केले. राष्ट्रवादीकडून ते निवडून आले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी त्यांचा पराभव घडवून आणला. त्यामुळे नाराज झालेले शंकर गडाख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या निवडणुकीत गडाख यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. ठाकरे यांनी गडाख यांना मंत्री करण्याचा शब्द दिला होता. आता कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. ठाकरे यांनी शब्द पाळला.

राहुरीचे माजी आमदार स्वर्गीय बाबूरावदादा तनपुरे यांचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे नातू आहेत. तनपुरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रसाद ऊर्फ बापूसाहेब तनपुरे हे पाच वेळा आमदारपदी निवडून आले. एकदा खासदार झाले. त्यांना मंत्रिपदाने अनेकदा हुलकावणी दिली. पूर्वी नेत्यांनी शब्द देऊनही ते मंत्री होऊ  शकले नव्हते. प्रदीर्घ काळ सत्ता मिळूनही मंत्री न झालेले नगरच्या राजकारणातील ते एकमेव आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीत होणाऱ्या राजकीय त्रासाला कंटाळून त्यांनी काही काळ शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पवार यांनी त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणले. त्यांचे चिरंजीव प्राजक्त यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.

सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुरीचा लौकिक वाढेल याकरिता प्राजक्तला संधी द्या. राज्याचे धोरण ठरविण्यासाठी उच्चशिक्षित तरुण निवडून द्या. मी यापूर्वी झालेला अन्याय दूर करून न्याय देईल, असे सांगितले होते. मेकॅनिकल इंजिनीअर असलेले प्राजक्त यांनी अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते राहुरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या आई उषा तनपुरे यादेखील नगराध्यक्षा होत्या. प्रसाद शुगर हा खासगी साखर कारखाना, भागीरथीबाई तनपुरे शिक्षण संस्था, बाजार समिती आदी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. मंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे त्यांना संधी मिळाली. जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत.