५ महिन्यांच्या चिमुकलीच्या तोंडून गळणारी लाळ थांबवण्यासाठी जिवंत मासा फिरवण्याचा उपाय (?) अंगाशी आला. कारण गुळगुळीतपणाणुळे हा मासा थेट ५ महिन्यांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला आणि या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरु झाली. या मुलीच्या मावशीने अर्धवट माहितीतून हा असला उपाय सुचवला होता. बारामतीत हा प्रकार घडला, इथल्या डॉक्टरांनी आपले कौशल्य पणाला लावून या चिमुकलीचा जीव वाचवला.

पाच महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते, जर तिच्या तोंडातून जिवंत मासा फिरवला ते लाळ गळणे बंद होईल अशी घरगुती उपचाराची अर्धवट माहिती असलेल्या या मुलीच्या मावशीने चिमुकलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. मात्र घडलं भलतंच, हा मासा थेट चिमुकलीच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला. शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत या बाळाचा श्वास काहीवेळा बंद झाला, पण बारामतीच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या मुलीचा जीव वाचवला.

बारामती येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने या मुलीचे प्राण वाचवले. तत्परता, प्रसंगावधान आणि तातडीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे ही मुलगी वाचली आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत् दिले आहे.

जळगावातील चाळीसगाव या ठिकाणी असलेल्या बापू माळी या उसतोड मजुराचे कुटुंब बारामती तालुक्यातील शिर्सूफळ या ठिकाणी आले. बापू यांची पाच महिन्यांची मुलगी अनू ही जन्मल्यापासून तोंडातून लाळ गाळते म्हणून अर्धवट माहिती असलेल्या तिच्या मावशीने जिवंत मासा पकडला आणि तो अनूच्या तोंडातून फिरवण्यास सुरुवात केली. मात्र हा मासा बुळबुळीत असल्याने तो मावशीच्या हातून निसटून थेट पाच महिन्यांच्या अनूच्या अन्ननलिकेत आणि मग श्वासनलिकेत गेला. या प्रकारामुळे अनूचा जीव घुसमटला, हे पाहताच बापू माळीने लेकीला घेऊन दुचाकीवरून बारामती गाठलं. डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात अनूला आणलं गेलं. मात्र तिथे येईपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा यांनी सीपीआर क्रिया करत तिचे हृदय पुन्हा सुरु करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने दुर्बिणीच्या मदतीने तिच्यावर शस्त्रक्रिया करून मासा बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांनी अनूचे प्राण वाचवल्याचे कळताच रुग्णालयात उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.