पुणे शहर हे पुणेरी पाट्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून विशिष्ट आशयाच्या फ्लेक्सबाजीमुळे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशाच प्रकारे आपल्या समस्या मांडण्यासाठी पुणेकरांनी आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत नगरसेवक हरवले आहेत, अशा आशयाचा फ्लेक्स पुण्यात पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ मधील चव्हाण बागेच्या परिसरात लावण्यात आला आहे. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या २०१७च्या निवडणुकीपूर्वी शहरातील अनेक भागात नगरसेवक हरवले आहेत, अशा फ्लेक्सबाजीतून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या फ्लेक्सबाजीला दीड वर्ष होत नाही, तोवर आज पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ मध्ये नगरसेवक हरवले आहेत. रोडवर ड्रेनेज मैलापाणी, रस्त्याची प्रचंड दुरावस्था, अपघातांची मालिका सुरू अशा मजकुराचा फ्लेक्स लावण्यात आला आहे.