मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला  झोडपले असून महामार्गाच्या नियोजित कामामुळे ओरोस,कसाल परिसरात घरात पाणी घुसले, तर तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ९४ मिलीमीटर पाऊस झाला, तर कणकवली तालुक्यात सर्वाधिक, १३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.    जिल्ह्यातील कसाल येथील कोलतेवाडीत घरात ओहळाचे पाणी घुसले होते त्यामुळे देविदास कृष्णा जाधव यांच्यासह पत्नी अर्चना देविदास जाधव (वय -५३ वर्षे) आणि मुले सुप्रिया देविदास जाधव (वय२७) व योगेंद्र देविदास जाधव (२९) यांना ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले.

जिल्ह्यात मंगळवारपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सिंधुदुर्गनगरी ओरोस जैतापकर कॉलनी येथे अक्षरश: पूर आला आहे. येथील महामार्गावर उभारण्यात आलेल्या उंच रस्त्यामुळे पावसाचे पाणी नजिकच्या घरात घुसत आहे. तोच प्रकार राजधानी हॉटेलजवळ  झाला आहे. ओरोस येथून कसालकडे जाताना डाव्या बाजूचे पाणी जैतापकर कॉलनीमधील वस्तीत घुसले. हे पाणी तेथील बंगले, बिल्डिंगच्या तळापर्यंत पोहोचले आहे. परिणामी येथील रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सव्‍‌र्हिस रस्त्याच्या शेजारी उभारण्यात आलेल्या बंधिस्त गटारात हे पाणी जात नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

जिल्ह्याच्या मुख्यालयात नैसर्गिक प्रवाह बंद करण्यात आल्याने पूर आल्यासारखे पाणी लोकवस्तीत घुसले होते त्यामुळे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारण्यात आला आहे. गड नदीला पूर आल्यानंतर मालवण तालुक्यातील महान, बागायत, कांदळगावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून घुमडाई मंदिराचे आवार पाण्याखाली गेले होते. आचरा-कणकवली रस्त्यावर पीसेकामते येथे वडाचे मोठे झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.भगवंतगड ते बांदीवडे येथील पूल नदीला पूर आल्याने पाण्याखाली गेला. कांदळगाव मसुरे रस्ता, आंबेरी पुल,निरूखे पूलही पाण्याखाली गेला होता. वाडा देवगडमध्येही पूरजन्य परिस्थिती असल्याचे आपत्कालीन यंत्रणेने नमूद केले आहे.

तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १६४.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या हे धरण ७७.२४ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडत असल्याने साठय़ामध्ये वेगाने वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने धरणात येणारे अतिरिक्त पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तसेच धरणाच्या परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे खरारी नाल्यातील पाणी नदी पात्रात येऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.  ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आजपासून पुढील कालावधीत नदी पात्रातून येजा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नदीकाठच्या सर्वच गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता, तिलारी शिर्षकामे उपविभाग, कोनाळकट्टा यांनी केले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात सर्वात जास्त, १३३ मिलीमीटर पाऊस पडला असून त्या खालोखाल कुडाळ (१२०), मालवण (१०४), दोडामार्ग (९५), सावंतवाडी (८७), देवगड (८६),  वेंगुर्ला (६९.६) आणि वैभववाडी (५९ मिमी) या इतर तालुक्यांमध्येही पावसाच्या मोठय़ा सरी पडल्या.