दुष्काळी स्थिती लक्षात घेता जिल्ह्य़ातील सर्व ११ तालुक्यात जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, तसेच पशुधन असणाऱ्या ठिकाणी अधिकचा पाणीपुरवठा करावा. बंदी तोडून चारा जिल्ह्याबाहेर जात असेल तर पोलिसांची मदत घ्यावी, असे आदेश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.
दुष्काळी स्थितीत नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारणाची कामे मंजूर करा, लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुंबईत मुंडे यांनी प्रशासकीय यंत्रणेची बठक घेतली. आमदार आर. टी. देशमुख, अॅड. लक्ष्मण पवार यांच्यासह जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुसिंग या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाअभावी तीव्र चाराटंचाई निर्माण झाली असून, पशुधन जगवण्यासाठी तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी विनंती मंत्री पंकजा मुंडे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला पत्र लिहून केली. भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चारा छावण्यांसह इतर दुष्काळी कामे सुरू करावीत, अशी मागणी केली. ग्रामविकास मंत्र्यांनीच दुष्काळी स्थितीत छावण्या सुरू करण्यास पुढाकार घेतल्यामुळे सरकारचा १५ ऑगस्टपर्यंत धोरणात्मक निर्णय होईल, असे मानले जाते.
बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाअभावी यंदा दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जात असला, तरी फारसा पाऊस पडला नाही. तसेच दोन दिवस सूर्यदर्शन झाले नसले, तरी केवळ पावसाची भूरभूर व टिपटिप राहिली. मंत्री मुंडे यांच्याकडे बीडसह लातूरचेही पालकमंत्री पद आहे. बुधवारी मुंडे यांनी पत्राद्वारे मदत व पुनर्वसन विभागाला तीन जिल्ह्यांत चारा छावण्या सुरू करण्याबाबत विनंती केली.
मराठवाडय़ातील ५० लाख पशुधनापुढे चाऱ्याची गंभीर स्थिती आहे. जुलच्या अखेरच जवळपास शेतकऱ्यांकडे असलेला चारा संपला असून, जास्तीत जास्त १५ ऑगस्टपर्यंत गरज भागवली जाईल. त्यानंतर मात्र पशुधन जगवण्यास चारा डेपो, छावण्या सुरू करणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्तांनी जुलअखेर सरकारला मराठवाडय़ातील चाऱ्याबाबत अहवाल पाठवला असून छावण्या सुरू करण्याची विनंती केली होती. या पाश्र्वभूमीवर मंत्री मुंडे यांनी ही मागणी केली.
गुरुवारी भाजप आमदार भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख यांच्यासह रमेश आडसकर, अॅड. सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर, संतोष राख आदींनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन जिल्ह्यात तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात, मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत नाला खोलीकरण, रस्त्याची कामे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी केली.