News Flash

मोदींची सत्ता २५ वर्षे टिकणार!

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोमवारी पाथर्डीतून(जि. नगर) झाली.

काँग्रेस व राष्ट्रवादीने आता विरोधी पक्षात बसण्याची सवय करून घ्यावी, मतदान यंत्रांना कितीही दोष  दिला तरी १५ वर्षांच्या सत्तेच्या मुजोरीने या दोन्ही पक्षांना हरवले आहे, त्यामुळे पुढील किमान २५ वर्षे तरी मोदींचीच सत्ता कायम राहील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी महाजनादेश यात्रे दरम्यान पाथर्डीत बोलताना केला.

काँग्रेस व राष्ट्रवादीने सुरु केलेल्या यात्रांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी जनतेने त्यांची सत्तेत असतानाची मुजोरी अनुभवली आहे. त्यांच्या यात्रांसाठी कार्यकर्तेही जमा होत नाहीत. ते आता मतदान यंत्रांच्या  नावाने ओरडत आहेत. परंतु याच मतदान यंत्राद्वारे  ते सन २००९ ते २०१४ मधील सर्व निवडणुका जिंकले होते. तेव्हा मतदान यंत्रे  चांगली होती , आता ती वाईट ठरवून मोदींना दोष देत आहेत. त्यांना मतदान यंत्रे नाही तर मतदार हरवतो आहे. विरोधकांची अवस्था अभ्यास न करणाऱ्या बुद्धु विद्यार्थ्यांप्रमाणे,  परीक्षेत नापास झाल्याचा दोष पेनाला देण्यासारखी झाली आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

कोकणातील १६७ टीएमसी पाणी मराठवाडय़ात

मराठवाडा व नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील सुमद्राला वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवण्यास मान्यता देण्यात आली असून त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. यासाठी ४० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे, त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पाच वर्षांत राज्यात परिवर्तन

जे काम काँग्रेस आघाडीला १५ वर्षांत करता आले नाही, ते आम्ही ५ वर्षांत करुन परिवर्तन घडवून दाखवले असा दावा करताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी सादर केली. पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या खात्यात विविध प्रकारच्या मदतीसाठी ५० हजार कोटी वर्ग केले, परंतु पंधरा वर्षांत त्यांनी केवळ २० हजार कोटीच केले. पेयजल योजनेत आम्ही १८ हजार गावांना पाणी दिले त्यांनी १५ वर्षांत केवळ ३ हजार गावांनाच दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ५ वर्षांत ३० हजार किमीची रस्ते झाले हा देशातील उच्चांक आहे. २० हजार किमीचे राष्ट्रीय तर १० हजार किमीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:20 am

Web Title: for the next 25 years we have the power says cm fadnavis
Next Stories
1 नॅक समितीसमोर मराठीचा प्राध्यापक डॉक्टरच्या भूमिकेत!
2 गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी एसटी गाडय़ांची खास सुविधा
3 नदीजोड प्रकल्पाचे भिजत घोंगडे
Just Now!
X