राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने परराज्यातून वाहतूक करत असलेला मोठा मद्यसाठा जप्त केला असून या कारवाईत ३२ लाख ६८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ७५० मिलिलिटरच्या बाटल्यांचे १९२ बॉक्स आढळले आहेत.

भरारी पथकाला मिळालेल्या महितीनुसार खानवेल-जव्हार रस्त्यावर गोरठाण चौक येथे सापळा लावून परराज्यातून आणलेला मद्यसाठा जप्त केला. दारूबंदी गुन्ह्यांतर्गत ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक डी. आर. परब, प्रसाद सातूरस्कर, दुय्यम निरीक्षक डी. काळेल आणि कर्मचाऱ्यांनी केली.

एका टेम्पोमध्ये हा मद्यसाठा शासनाचा महसूल बुडवून परराज्यातून आणला जात होता. विशेष म्हणजे ही वाहतूक या टेम्पोतून विशिष्ट कप्पा बनवून केली जात होती. या प्रकरणी टेम्पोचालक रईस मुस्तकीन अन्सारी याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.