“विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं” असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या ‘ लोकसत्ता‘ तर्फे आयोजित वेबसंवादात आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. याच वेबसंवादात त्यांना महाराष्ट्रात जी काही परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या आधी होती त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.

“विधानसभेची निवडणूक आम्ही युती म्हणून लढलो होतो. मात्र आमच्या जागा कमी यायला पाहिजेत असं काहीसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आधीच ठरलं होतं असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावेळी वाटलं होतं की हे सगळं स्थानिक पातळीवर होतं आहे. जसं पुण्यात झालं, पुण्यात थेट राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत केली. त्यामुळे आमच्या दोन जागा पुण्यात गेल्या. नंतर लक्षात आलं की त्यांचं सगळं आधीच ठरलं होतं.” असंही फडणवीस म्हणाले.

राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अंडरस्टँडिंग झालं होतं, जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार आमच्याविरोधात लढत असेल तिथे शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत करायची असं ठरलं होतं. आम्हाला १२०-१२५ जागा मिळायला हव्या होत्या मात्र आम्हाला १०५ च जागा मिळाल्या. थोड्या थोड्या मतांनी आमच्या भरपूर जागा गेल्या. मात्र या शिवसेनेला मोठा फटका बसला. कारण शिवसेनेच्या फक्त ५६ जागा विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या. खरंतर राज्यात त्यावेळी इतकं सगळं चांगलं वातावरण होतं की आमच्या १३० जागा येऊ शकल्या असत्या आणि शिवसेनेच्या जागा ९० च्या आसपास जागा येऊ शकल्या असत्या. मात्र जे काही शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरलं होतं त्याचा फटका बसला. त्यानंतर काय रामायण आणि महाभारत घडलं ते सगळ्यांना माहित आहेच असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.