ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकशाहीची मूल्यं या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. मागील तीन महिन्यात ठाकरे सरकारने फक्त एकच काम केलं आहे ते म्हणजे सुरळीत सुरु असलेल्या कामांना स्थगिती देण्याचं. त्यामुळे हे प्रगती सरकार नाही तर स्थगिती सरकार आहे असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा जुन्या सरकारच्या चांगल्या योजनांना स्थगिती दिली नाही, उलट जनतेसाठी त्या सुरु ठेवल्या असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

” भाजपाचं सरकार आल्यावर मराठा समाजाला दोन वचनं दिली होती. एक होतं ते आरक्षणाचं आणि दुसरं अरबी समुद्रात शिवस्मारकाचं. ही दोन्ही आश्वासनं आम्ही पाळली आहेत. मात्र शिवस्मारकाचं काम ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं आहे” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हे ऑटो रिक्षा सरकार आहे. हे तीन चाकाचं सरकार वेगवेगळ्या दिशेनं काम करतं आहे त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. विरोधी पक्षात बसून या सरकारला हलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मागासवर्गीय रिपोर्टच्या आधारे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मराठा समाजातील तरुणांचं आंदोलन सुरु आहे त्यांची दखल सरकारकडून का घेतली जात नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. शिवस्मारकाचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी आदेशामुळे थांबलं आहे. सध्याच्या सरकारने काम थांबू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला हवी. मात्र हे सरकार तसं करत नाही. त्यामुळे हे सरकार स्थगिती सरकार आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.