“महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू नाही. महाविकास आघाडी सरकार हे आपल्या अंतर्गत विरोधकांमुळेच पडेल,” असं मत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. सरकार पाडण्यात भाजपाला कोणताही रस नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.

बंद खोलीमध्ये अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची एक तास चर्चा झाली. दरम्यान, ही भेट राजकीय नव्हती अशी माहिती त्यानंतर फडणवीस यांनी दिली. साखर उद्योगांसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्हाला राज्यात अस्थिरता निर्माण करण्याची इच्छा नाही. ही वेळ करोना व्हायरशी संघर्ष करण्याची आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधानचं पडेल,” असंही त्यांनी नमूद केलं. आम्ही महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळही मागितला असल्याचे फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री; फडणवीसांनी आता स्वप्नचं पाहावी”

त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगांच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली होती. त्याचबरोबर राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. शरद पवारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवार त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय आणि अशी काही स्पर्धा नाहीये की त्यांनी काय केलं म्हणून आम्ही करायचं. तसेच आम्ही काय केलं म्हणून त्यांनी काय करायचं. आम्हाला असं वाटतं की, सध्या साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या पक्षातील साखर उद्योगात असलेल्या नेत्यांनीही याचं गांभीर्य आमच्या लक्षात आणून दिलं आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणं, हे अपेक्षितच आहे म्हणून आम्ही आलो आहोत,” असं फडणवीस म्हणाले होते.

आणखी वाचा- भर रस्त्यात पोलिसाशी हुज्जत; संबंधित तरूण विनायक राऊतांचा मुलगा असल्याचा निलेश राणेंचा दावा

काँग्रेसलाही टोला

”आमचं म्हणणं एवढंच आहे की, फोटो कुणाचेही छापा. पण, तुम्ही ज्या मोठंमोठ्या घोषणा केल्या आहेत. इतक्या लोकांना रोजगार देऊ, इतक्या लोकांना नोकऱ्या मिळेल. इतक्या कंपन्या येतील. त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करा. बाकी तुम्हाला ज्याचे फोटो छापायचे आहेत आणि ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत, त्यांचे दाखवा. आपापसात मारामाऱ्या करा, काहीही करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे असा विचार करा,” असा टोलाही काँग्रेसच्या नाराजीवरून फडणवीस यांनी लगावला होता.