आपल्या कार्यकर्त्यांकडे पाठ; भाजप नेत्याच्या कुटुंबाचे सांत्वन

नगर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  शनिवारी नगर शहर दौऱ्यात दिवंगत भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र त्याचवेळी दिवंगत निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी तथा भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ँड. आर. आर. पिल्ले यांच्या कुटुंबीयांकडे मात्र पाठ फिरवली. याचे तीव्र पडसाद काँग्रेस कार्यकत्र्यांमध्ये उमटले. निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची संपत्ती आहे. त्यांचा मानसन्मान ठेवणे ही पक्षाची जबाबदारी आहे, अशी भावना प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी व्यक्त केली.

ब्रिटिश काळातील सरोष बॉम्बहल्ल्यातील स्वातंत्र्यसेनानी रत्नम पिल्ले यांचे चिरंजीव व भिंगार शहर काँग्रेसचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले अ‍ॅड. पिल्ले यांचे नुकतेच निधन झाले. प्रदेश काँग्रेसच्या वतीने  शनिवारी  भिंगार येथील पिल्ले यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदेश काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी मंत्री थोरात यांच्या कृतीबद्दल  नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रदेश सदस्य शाम वागस्कर, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक रुपसिंग दादा कदम, स्व. पिल्ले यांचे बंधू गोपाल पिल्ले, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, राजेश सटाणकर, भिंगार महिला अध्यक्षा मार्गारेट जाधव, सरचिटणीस अनिल परदेशी उपस्थित होते. स्व. पिल्ले यांच्या निवासस्थानी झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात   शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले,  काँग्रेस नेत्यांनी  पिल्ले यांच्या निधनानंतर दाखवलेली संवेदनहीनता दु:खदायक आहे.   थोरात काल  शहरात होते. त्यांच्या उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेसची बैठक झाली. मात्र  पिल्ले यांना बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नाही. याउलट भाजपच्या माजी खासदाराच्या घरी जाऊन  थोरात व  काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. थोरात हे चुकीच्या सल्लागारांमुळे नगर शहरातील काँग्रेस पक्ष संघटनेचे नुकसान करीत आहेत. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले.

पिल्लेंच्या स्मरणार्थ ‘निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार’

नगर जिल्ह्यातील निष्ठावंत पक्ष कार्यकत्र्याला दरवर्षी ‘निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार’ देण्यात येईल, अशी घोषणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देशमुख यांनी यावेळी केली. दरवर्षी मार्च महिन्यात जिल्हास्तरावर निष्ठावंत कार्यकत्र्यांचे संमेलन आयोजिण्यात येणार असून त्यावेळी हा पुरस्कार वितरित करण्यात येईल.