सहा वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई

काँग्रेसचे माजी महापौर, महापालिकेतील पक्षाचे गटनेते संदीप कोतकर याचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. याबरोबरच कोतकरला पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरवण्यात आले आहे. मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी काल, शुक्रवारी सायंकाळी या कारवाईचा आदेश काढला. संदीप कोतकर खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कोतकरवरील अपात्रतेच्या कारवाईमुळे लवकरच होणाऱ्या स्थायी समिती सदस्य निवडीतील काँग्रेसच्या संख्याबळावरही परिणाम होणार आहे.

मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ चे कलम १० (१), (अ) अन्वये ही कारवाई आयुक्तांनी केली. मनपाच्या सन २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत कोतकर केडगाव उपनगरातील, प्रभाग ३२ (ब) मधून कॉंग्रेस पक्षाकडून निवडून आला होता. त्यानंतर तो काँग्रेस पक्षाचा मनपात गटनेता झाला. दरम्यान, सन २००८ मध्ये शेवगावचा लॉटरी विक्रेता अशोक लांडे या तरूणाच्या खुनाच्या आरोपावरुन कॉंग्रेसचे तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्यांची तीन मुले माजी महापौर संदीप, अमोल व सचिन अशा चौघांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने १ एप्रिल २०१६ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याच तारखेपासून संदीपला अपात्र ठरवले गेले आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपिल दाखल आहे. संदीपला शिक्षा देण्यात आल्याने त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी मनपाच्या महासभेत शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे यांनी केली होती. तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांनी त्यावर न्यायालयाकडे मार्गदशर्न मागवण्याचा ठराव केला होता. प्रशासनाने जिल्हा न्यायालयाकडे यावर मार्गदशर्न मागवले होते. न्यायालयाने सप्टेंबर २०१७ मध्येच संदीपचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यावर कार्यवाई झाली नाही.

संदीपने शिक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. जामीन अर्जही दाखल केला आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. दरम्यान, नगर महापालिकेची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपते आहे. परंतु संदीपच्या अपात्रतेची मुदत सन २०२४ पर्यंत आहे.

स्थायीच्या निवडणुकीत फटका

महापालिकेत कॉंग्रेसचे संख्याबळ ११ होते. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यातील संजय लोंढे यांच्यावरही अपात्रतेची कारवाई झालेली आहे. त्याचे अपील नगरविकास मंत्र्यांकडे त्यांनी दाखल केले आहे. संदीप कोतकर याच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने कॉंग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ आता नऊवर आले आहे. त्याचा परिणाम पुढील महिन्यात होणाऱ्या स्थायी समिती सदस्य निवडणुकीवर होणार आहे.