राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय व इडीच्या रडारवर असलेल्या वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी एक परवानगीचं पत्र दिलं होतं. लॉकडाउन काळात वाधवान कुटुंबियांना प्रवासाची परवानगी कशी मिळाली यावरुन राज्यात बराच गदारोळ माजला होता. यावर तात्काळ पावलं उचलत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र याच घटनेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचा नियम मोडणाऱ्या आरोग्य मंत्र्यांचं तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पद काढून घेतलं. उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र आपण अमिताभ गुप्ता यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता, अशा शब्दांत शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
न्यूझीलंड च्या राष्ट्राध्यक्षांनी लॉक डाऊन चा नियम मोडल्याबद्दल आपल्या आरोग्य मंत्र्यांचा माफीनामा फेटाळून त्यांना पदावनती लादली !उद्धवजी आम्ही तुमच्याबरोबर आहोतच पण गृह सचिव अमिताभ गुप्ता यांचेवर कठोर कारवाई चे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता @ANI, @CMOMaharashtra— Raju Shetti (@rajushetti) April 12, 2020
वाधवान प्रकरणात गुप्ता यांनी दिलेल्या पत्राची चौकशी करण्यासाठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी ते चौकशी करून पंधरा दिवसांमध्ये आपला अहवाल सरकारला सादर करणार आहेत. तसंच पुढील आदेश येईपर्यंत अमिताभ गुप्ता यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तसंच प्रधान सचिव (विशेष) या पदाचा कार्यभार गृह विभागातील अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा) श्री कांत सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते या पदाची जबाबदारी पार पाडतील.