अकोला : ‘फेसबुक’ या समाजमाध्यमाने तयार केलेल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत जिल्हय़ातील चार नेत्यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे यांना फेसबुकने ‘ब्लू टीक’ची मान्यता देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला. सर्वाधिक ‘फॉलोअर्स’ अ‍ॅड. आंबेडकर यांचे असून यामध्ये दुसऱ्या स्थानी डॉ. सुधीर ढोणे आहेत.

अभिनेते, खेळाडू, लेखक, गायक, प्रभावशाली राजकीय नेते व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अन्य व्यक्तींना फेसबुक ‘ब्ल्यू टीक’ ची मान्यता देते. सध्या सर्वाधिक एक लाख ९० हजार ५२४ ‘फॉलोअर्स’ अ‍ॅड. आंबेडकरांचे असून दुसऱ्या क्रमांकावर डॉ. सुधीर ढोणे आहेत. त्यांचे एक लाख १९ हजार २४३ ‘फॉलोअर्स’ असून तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे एक लाख १६ हजार ८७८ तर चौथ्या क्रमांकावर माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे एक लाख १५ हजार ४६७ ‘फॉलोअर्स’ आहेत. ‘ब्ल्यू टीक’ ची मान्यता देताना संबंधित नेत्यांच्या ‘फेसबुक’ पानावर असलेल्या ‘फॉलोअर्स’ ंची संख्या, त्यांनी पानावर टाकलेल्या ‘पोस्ट’ला प्रतिसाद, त्या राजकीय नेत्यांचे पद, समाजातील लोकप्रियता व प्रतिष्ठा आदी मुद्दे विचारात घेतले जातात. प्रभावशाली नेत्यांच्या यादीतील अ‍ॅड. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार असून राज्यांत त्यांना बराच मोठा जनाधार आहे. संजय धोत्रे हे सलग चार वेळा लोकसभेत विजयी झाले असून केंद्रात राज्यमंत्री आहेत.

डॉ. रणजीत पाटील हे सलग दोन वेळा पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले असून मागील सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.