वनाधिकारी असल्याचे सांगून तरुणीवर अत्याचार

वार्ताहर,चंद्रपूर : वनाधिकारी असल्याचे सांगून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली. कुणाल घोडाम, शुभम घोडाम, संदीप तलांडे, अशोक कन्नाके अशी आरोपींची नावे आहेत.

एका कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कामाला असलेल्या एका युवकाचे राजोली येथील युवतीशी प्रेमसंबंध होते. १४ जून २०१५ या घटनेच्या दिवशी दोघांनी चंद्रपूरला भेटायचे ठरवले. युवती रेल्वेने पोहोचली तर तिचा प्रियकर युवक मोटारसायकलने आला. या दोघांनी माता महाकालीचे दर्शन घेतले. त्यानंतर दोघेही मोटारसायकलने मूल मार्गे राजोलीकडे निघाले.

दरम्यान, घंटाचौकीजवळच्या विष्णू मंदिरात ते थांबले असता आरोपी शुभम, अशोक आणि संदीप तेथे पोहोचले. आम्ही वनविभागाचे गार्ड आहोत, आम्हाला दहा हजार रुपये दे, अशी मागणी त्यांनी त्या तरुणाकडे केली. पैसे नाही असे उत्तर दिल्यानंतर त्यांनी वनाधिकारी म्हणून कुणाल यास फोन करून बोलावले.  कुणाल घोडाम आणि अशोक कन्नाके यांनी त्या तरुणास मारहाण केली. दरम्यान, शुभम व संदीपने तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. तेवढय़ात तेथून काही वनविभागाचे कर्मचारी जात असल्याने या सर्व आरोपींनी पळ काढला.

या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश प्रदीप भेंडे यांनी सर्व आरोपींना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. सुधाकर डेगावार यांनी काम पाहिले.