मोबाइल कंपनीचे टॉवर तुमच्या शेतात उभे करतो म्हणून ४८ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना अंबेजोगाई  (जि. बीड) शहरात घडली आहे. याप्रकरणी गंगा टॉवर, लक्ष्मी टॉवर व त्यांच्या व्यवस्थापकाविरोधात येथील शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जून २०१५ मध्ये गंगा टॉवर, लक्ष्मी टॉवर यांच्याकडून शेतात मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करण्याबाबत जाहिरात देण्यात आली होती. त्यावरून अॅड. प्रवीण गजानन पेडगावकर यांना तुमच्या शेतात टॉवर उभा करतो असे सांगितले. व्यवस्थापक पूजा व निखिल यांच्या सांगण्यावरून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पेडगावकर यांनी टप्प्याटप्प्याने ४८ हजार रूपये भरले. मात्र, पेडगावकर यांच्या शेतात आतापर्यंत टॉवर उभारण्यात आला नाही.

प्रवीण पेडगावकर यांनी याबाबत वारंवार चौकशी केली. अखेर आपली फसवणूक झाल्‍याचे त्यांच्या लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी गंगा टॉवर, लक्ष्मी टॉवर व त्याच्या व्यवस्थापक निखिल व पूजा यांच्या विरूद्ध कलम ४२०, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपास करत आहेत.