ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या कार्यक्रमांतर्गत २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत गवळीवाडा येथील एका महिलेची तब्बल ५ लाख २९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  संबंधित संशयित आरोपींनी सांगितल्यानुसार विशिष्ट बॅंक खात्यात पैसे भरल्यानंतरदेखील लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्या आधारे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   फिर्यादी कैसेरबानू इब्राहिम काझी ( वय ४३ वर्षे, रा. गवळीवाडा रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश वर्मा, अनिल कुमार यादव आणि नंदकिशोर पासवान अशी नावे सांगितलेल्या तिघाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चन यांच्या ‘कौन बनेगा.’ या कार्यक्रमाच्या बक्षीस योजनेमध्ये तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असा संदेश गेल्या ११ नोव्हेंबर रोजी काझी यांच्या मोबाईलवर व्हॉटसॅपच्या माध्यमातून आला. या संदेशासोबत एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. त्या पाठोपाठ एका आरोपीने काझी यांना, बँकेच्या व्यवस्थापकाशी बोलण्यास सांगून एक मोबाईल फोन क्रमांकही दिला. त्या क्रमांकावर काझी यांनी फोन केला असता पलिकडून बोलणऱ्या तोतया बँक व्यवस्थापकानेही २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे सांगितल्याने काझी यांचा विश्वास बसला. यानंतर आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन करून लॉटरीचे पैसे खात्यात जमा करणे, परकीय चलन भारतीय चलनात रूपांतरित करण्याचे शुल्क, वस्तू व सेवा कर इत्यादींसाठी आगाऊ  रक्कम भरणे आवश्यक असल्याचे सांगून काझी यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख २९९ रुपये उकळले. इतके पैसे भरल्यानंतरही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आणि  त्याबाबत पाठपुरावा केला असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे काझी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.