सामाजिक बांधीलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी आणि समूह जीवनाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, या प्रमुख उद्देशाने मुक्त विद्यापीठ युवक महोत्सवांचे आयोजन करीत असते, असे प्रतिपादन गोवा विभागीय केंद्राचे विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांनी येथे केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डॉ. जे. बी. नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, सावंतवाडी आणि भाईसाहेब सावंत अभ्यास केंद्र, दोडामार्ग या अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील आर. पी. डी. हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या ‘ज्ञानांगण २०१३’ या युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य स्मिता केळुसकर, विद्या सावंत, सी. एल. नाईक उपस्थित होते. या वेळी प्रा. मोरे म्हणाले, ‘केवळ पदवी मिळविणे हा उद्देश विद्यार्थ्यांने ठेवू नये, ज्ञानाबरोबरच आपल्यातील सुप्त कौशल्ये ओळखणे आणि त्यांचा विकास करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण असते, असे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास घडविते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विकास सावंत म्हणाले, शिक्षण क्षेत्रात बालवाडीपासून सध्या जी अनावश्यक स्पर्धा सुरू झाली आहे ती अयोग्य आहे. मुक्त विद्यापीठाचे कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे केल्याबद्दल आणि पहिल्याच वर्षी ४५० विद्यार्थ्यांची नोंदणी करून राज्यात कोणत्याही अभ्यास केंद्राला शक्य न झालेला विक्रम केल्याबद्दल तुषार वेंगुर्लेकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागांत या विद्यापीठाचे चांगले कार्य केल्याबद्दल प्रा. डी. व्ही. राजगोळकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. व्ही. राजघोळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुमेधा नाईक व प्रा. नारायण परब यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष हेमंत मराठे यांनी केले. या वेळी मुक्त विद्यापीठाच्या डॉ. जे. बी. नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, सावंतवाडी आणि ना. भाईसाहेब सावंत अभ्यास केंद्र, दोडामार्गच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.