औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून एका तरूणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी मध्यरात्री गारखेड्यातील न्यायनगरात ही घटना घडली आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर आरोपी आणि मृत तरूणांमध्ये वाद सुरू झाला होता. किरकोळ वादांचे रूपांतर हाणामारीत झाले. अटक करण्यात आलेल्यापैकी तिघांवर अनेक गुह्याची नोंद असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

सचिन वाघ असे मृत व्यक्तीचं नाव आहे. तर विकी वाहूळ, सुरेश रांजणे, साईनाथ येळणे , रोहित नरवडे आणि पवन देवकर अशी आरोपींची नावे आहेत. चार जणांना जालन्याजवळ सोमवारी दुपारी चार वाजता ताब्यात घेतले तर विकी वाहूळ याला कन्नडहून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन वाघ आणि आरोपी मित्रांनी रविवारी दुपारी नर्सरी शाळेजवळ मद्य प्राशन केले. नशेत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री सचिनला आरोपींनी रात्री घराबाहेर बोलावले. भाऊ खूपवेळ झाले तरी घरी परतला नाही हे पाहून मध्यरात्री अजय (सचिनचा भाऊ) त्याच्या शोधात घराबाहेर पडला. त्यावेळेस भाऊ आणि वरील सर्व आरोपी अजयला दिसले. त्यावेळी अजयने आरोपींना हॅप्पी दिवाळी असे म्हटले. दिवाळीच्या शुभेच्छा देताच आरोपी निलेश रांजणेने त्याला शिवी दिली. भावाला शिवी दिल्याच्या रागातून चिडलेल्या सचिन वाघने निलेशला बेल्टने मारले. त्यानंतर निलेशने सुरी काढून सचिनवर वार केले. या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला स्थानिक घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. सोमवारी सकाळी ११वा. सचिनला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. किरकोळ वादानंतर वरील प्रकरण घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.